इस्लामी कट्टरतेविरोधात एकजूट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2020
Total Views |

Narendra Modi_1 &nbs
 
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केवळ इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थनच केले नाही, तर फ्रान्समधील घटनेला दहशतवादी कृत्य ठरवले. तसेच तुर्कीच्या अध्यक्षांच्या अशोभनीय विधानाचा निषेधही केला. भारताने कट्टर इस्लामविरोधात उचललेले हे पाऊल व फ्रान्सला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरतो.
 
 
 
इस्लामी कट्टरतेचा भेसुर चेहरा दिवसेंदिवस उग्र होत चालला असून, त्याविरोधात जीवन जगण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मानवी समुहाने किंवा राष्ट्राने उभे ठाकले नाही, तर भविष्यकाळ आणखी भयानक असेल. चालू महिन्यातच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये धर्मांध मुस्लीम जिहाद्याने ‘शार्ली हेब्दो’तील मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवल्याने शिक्षकाचा शिरच्छेद केला. नंतर पोलिसांनी दहशतवाद्याचा खात्माही केला, पण फ्रेंच जनता शांत बसली नाही व त्यांनी आपला आक्रोश रस्त्यावर उतरुन दाखवून दिला. देशातील नागरिकांच्या कट्टर इस्लामविरोधातील संतापाला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही साथ लाभली आणि त्यांनी शिक्षकाच्या हत्येला दहशतवादी हल्ला ठरवले. इतकेच नव्हे तर इस्लाम जगावरील संकट असल्याचे स्पष्ट करत मोहम्मद पैगंबराची व्यंगचित्रे आम्ही माघारी घेऊ शकत नाही, असेही ठणकावले. फ्रान्समधील सरकारी इमारतींवरही मोहम्मद पैगंबराची व्यंगचित्रे झळकावली गेली व कट्टरतेविरोधात जनता आणि सरकार बरोबर असल्याचे फ्रान्सने सांगितले. पण, फ्रान्समध्ये धर्मांध जिहाद्याने शिक्षकाची हत्या केली तरी निषेधाचा शब्दही न काढणारे इस्लामी देश इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कट्टरतेविरोधातील लढ्यावर मात्र टीका करु लागले. जगातील सर्वच मुस्लीम देशांनी फ्रान्सच्या बहिष्काराची व मॅक्रॉन यांच्या निषेधाची भाषा केली. तरीही फ्रेंच अध्यक्ष डगमगले नाहीत ना झुकले व आपला लढा असाच सुरु राहील, असे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. दरम्यान, शिक्षकाची हत्या, फ्रेंच नागरिकांचा संताप व मुस्लीम देशांच्या विरोधातच फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कट्टर इस्लामी जिहाद्याने एका चर्चमध्ये हल्ला केला व तीन महिलांचा जीव घेतला. अर्थात, इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासारख्या एक नाही, तर अनेकांची आमच्यासारख्या धर्मांधांना संपवण्यासाठी गरज असल्याचेच त्या हल्लेखोराने आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखवले. त्यामुळे फ्रान्सचा इस्लामी धर्मांधतेविरोधातील लढा आणखी प्रबळ होईल, कदाचित जिहादविरोधी लढ्यात फ्रान्स युरोपचे नेतृत्वही करेल (कारण, जर्मनी किंवा ब्रिटन अजूनही आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या नि उदारवादाच्या नशेत चूर आहेत), तसेच तुर्की व पाकिस्तानसारखे देशही उत्तरोत्तर आणखी बिथरत जातील. परंतु, युरोप आणि मध्य-पूर्व इस्लामी कट्टरतेवरुन पेटलेले असताना भारतानेदेखील यात उडी घेतली व फ्रान्सला आपले समर्थन दिले, हे उल्लेखनीय व भारताचे परराष्ट्र धोरण पुढील काळात कोणत्या मार्गाने जाईल, हे सांगणारीही घटना.
 
 
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जिहादी कट्टरतेविरोधात आघाडी उघडल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात तुर्कीचे अध्यक्ष रसिप तय्यप एर्दोगान व पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आघाडीवर होते. तुर्कीला इस्लामी जगताचा म्होरक्या होऊन खलिफापद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने एर्दोगान यांनी मोहम्मद पैगंबराची व्यंगचित्रे व मॅक्रॉन यांच्या भूमिकेविरोधात काहूर माजवले. जेणेकरुन अन्य इस्लामी देश तिथली जनता आपल्याकडे आकर्षित होईल, आपले नेतृत्व मान्य करेल. पाकिस्तानची अवस्थाही त्याहून निराळी नाही. कट्टर इस्लामसाठीच पाकिस्तानचा जन्म झाला व त्याचे अस्तित्वही त्यासाठीच आहे. त्यामुळे अन्नानदशा झालेल्या देशवासीयांच्या उरात ‘इस्लाम खतरे में’ व इस्लामी एकतेची धुंद भरली की ती मूलभूत प्रश्न विसरेल, या आशेने इमरान खान यांनीही तुर्कीच्या सुरात सूर मिसळले. अन्य इस्लामी राष्ट्रांनीही एकजूट होऊन फ्रान्सचा विरोध केलाच, पण आपल्या विरोधाची धार त्यांच्यापेक्षा तीव्र असेल याची काळजी तुर्की व पाकिस्तानने घेतली. इमॅन्युएल मॅक्रॉन मुस्लिमांना विभाजित करुन त्यांना भडकावत असल्याचा दावा इमरान खान यांनी केला. रसिप तय्यप एर्दोगान यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन मनोरुग्ण असून त्यांना उपचार करुन घ्यावेत, असा आगावू सल्ला दिला. तथापि, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केवळ इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थनच केले नाही, तर फ्रान्समधील घटनेला दहशतवादी कृत्य ठरवले. तसेच तुर्कीच्या अध्यक्षांच्या अशोभनीय विधानाचा निषेधही केला. भारताने कट्टर इस्लामविरोधात उचललेले हे पाऊल व फ्रान्सला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरतो. कारण, आतापर्यंत सर्वच इस्लामी देश फ्रान्सच्या जिहादविरोधी लढ्यावर आक्षेप घेत होते, पण त्यांची भीडभाड न बाळगता भारताने आपले मत मांडले, हे निश्चितच स्वागतार्ह!
 
 
“आंतरराष्ट्रीय वाद-विवादाच्या प्राथमिक निकषांच्या उल्लंघन प्रकरणात फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात अस्वीकारार्ह भाषेतील वैयक्तिक हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही भयानक पद्धतीने क्रूर दहशतवादी हल्ल्यात फ्रेंच शिक्षकाचा जीव घेतला गेला, त्या घटनेचाही निषेध करतो. आम्ही त्यांचे कुटुंबीय व फ्रेंच जनतेबद्दलही संवेदना व्यक्त करतो. कोणत्याही कारणाने किंवा परिस्थितीत दहशतवादाच्या समर्थनाचे औचित्य नाही,” अशा स्पष्ट शब्दांत भारताने आपली भूमिका मांडली, भावना व्यक्त केल्या. फ्रान्सनेदेखील भारताच्या भूमिकेबद्दल आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधात आघाडी उघडली होती. जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करुन त्यांनी कट्टरतेविरोधातील सर्वांच्या एकजुटीचे प्रयत्न चालवले होते व आज पोळलेल्या फ्रान्सला पाठिंबा देऊन आपण इथून पुढेही त्यावर कायम असल्याचे भारताने सांगितले. सोबतच भारताच्या आताच्या विधानांवरुन दोन मुद्दे प्रामुख्याने स्पष्ट होतात. पहिला म्हणजे रसिप तय्यप एर्दोगान यांच्या अशोभनीय भाषेचा निषेध करत फ्रान्सचे उघडपणे समर्थन करणे. दुसरा मुद्दा म्हणजे, भारतानेही शिक्षकाच्या हत्येला वैयक्तिक कृत्य न मानता दहशतवादी हल्ला ठरवले. त्यामुळे ते अर्थातच कट्टरपंथीयांना पचणार नाहीच. पण यातून भारताने एर्दोगान यांना त्यांची जागाही दाखवून दिली. कारण, एर्दोगान यांनी काश्मीर मुद्दा किंवा सीएए-एनआरसीवरुन सातत्याने भारतविरोधी विधाने केली होती. तसेच भारतातील मूलतत्त्ववादी कारवायांनाही तुर्कीचा पाठिंबा असल्याचे समोर आले होते. अशात आम्ही तुमच्यासारख्या जिहादसमर्थकांविरोधात एक असल्याचे भारताने सांगितले. सोबतच फ्रान्सला पाठिंबा देऊन आम्ही जगात प्रबळ शक्ती म्हणून भूमिका निभावू इच्छितो, हेही भारताने दाखवून दिले. भारताचे परराष्ट्र धोरण आगामी काळात यासारखेच असेल, हेही यातून स्पष्ट होते. अर्थात ही फक्त सुरुवात आहे, इस्लामी कट्टतेविरोधातील लढा भारतासह सर्वांनाच अधिकाधिक जोरदार करावा लागणार आहे. कारण, भारताने मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळातील नव्वदच्या दशकापर्यंत व आताही त्याचा त्रास सहन केला. मात्र, मोदी पंतप्रधानपदी आले व देशातील जिहादी हल्ले जवळपास थांबलेच, कट्टर इस्लामवर लावलेला हा अंकुश मोदींच्याच माध्यमातून जगभरात पोहोचला तर ते भारतासाठीही अभिमानास्पद व कौतुकास्पदच असेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@