मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅमेझॉन कंपनीने मराठीच्या समावेशासाठी पाऊले उचलली. त्यानंतर आता मनसेचा मोर्चा इंडियन प्रीमियर लीगकडे वळला आहे. “आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल”, असा इशारा मनेसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे दिला आहे.
“आयपीएल क्रिकेट सामान्यांचे समालोचन मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करु, पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या”, असादेखील इशारा मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईक यांनी दिला. त्यांनी ट्विटवर पत्राचा फोटो शेअर करत ही माहिती दिली.
“डिस्ने हॉटस्टार या ओ.टी.टी. व्यासपीठावर आयपीएलचे टी-२० सामने दाखविण्यात येत आहेत. हे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाचे समालोचन त्यांच्या पसंतीच्या भाषेत ऐकण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कनडा आणि बंगाली भाषा निवडण्याचा पर्याय आहे. पण महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही. डिस्ने हॉटस्टारचे मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आहे. विशेष म्हणजे आयपीएलचे टी-२० सामने पाहणारा मराठी भाषिक प्रेक्षकवर्ग असताना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडला. मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला गेला”, असा आरोप मनसेने पत्रात केला आहे.