बँक खाते 'डॉरमन्ट' झाल्यास...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020   
Total Views |
Bank Dormaint _1 &nb


'डॉरमन्ट' म्हणजेच वापरात नसलेली बँक खाती. तेव्हा, अशाप्रकारे आपले खाते डॉरमन्ट होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी? ते 'डॉरमन्ट' झाल्यास बँकेकडून आपल्या खात्यातील रक्कम कशाप्रकारे परत मिळविता येते, यासंबंधी मार्गदर्शन करणारा आजचा लेख...

 

काही माणसे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कुटुंबाला किंवा नातलगांना फारशी देत नाहीत व अशांचा जर अचानक मृत्यू झाला, तर त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कोणालाही नसते. काही लोकांची बर्‍याच बँकेत खाती असतात. शहर किंवा वास्तव्याचे ठिकाण बदलल्यामुळे किंवा नोकरीत बदल झाल्यामुळे बरेदचा सगळ्याच खात्यांत व्यवहारही होत नाहीत. कोणत्याही खात्यात ठराविक कालावधीत ग्राहकाने काही व्यवहार केले नाहीत तर, अशी खाती 'डॉरमन्ट' अथवा 'निष्क्रिय' ठरविली जातात. अशा खात्यांत बँकांकडे बराच निधी आहे. 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने २०१४ साली 'डिपॉझिटर्स एज्युकेशन आणि अवेअरनेस फंड' (डीईएएफ) निर्माण केला व बँकांना 'डॉरमन्ट' खात्यात जमा असलेला निधी या खात्यांत जमा करण्याच्या सूचना दिल्या. मार्च २०१५ मध्ये 'डीईएएफ' मध्ये ७८७५ कोटी रुपयांचा निधी जमा होता, तर मार्च २०१९ अखेर २५ हजार कोटी रुपयांचा निधी जमा होता.

 

'डीईएएफ' खात्यात सर्व बँकांतून जमा झालेला निधी सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो व याबाबतचे निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने समिती नेमलेली आहे. तसेच ठेवींवरील व्याज देण्यासाठी, गुंतवणूकदारांना प्रशिक्षित करण्यासाठी सर्व बाबींची माहिती देण्यासाठी वापरला जातो. 'डॉरमन्ट' खात्यात वाढत असलेली रक्कम व 'डीईएएफ'ला निधीवर मिळणारा परतावा यामुळे 'डीईएएफ' निधी सारखा वाढतच असतो.

 

'डीईएएफ'मधील रकमेवर रिझर्व्ह बँक व्याज देते व व्याजाचे दर वेळोवेळी निश्चित केले जातात. 'डॉरमन्ट' खात्यातील रक्कम ज्याचे खाते आहे, ती व्यक्ती किंवा त्याचे कायदेशीर वारसदार यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र बँकेला सादर करून आपली रक्कम मिळवू शकतात. कागदपत्रात मुख्यत्वे 'केवायसी' पुराव्यांचा अंतर्भाव असतो. ज्यांचा हा निधी आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा पैसा परत देण्यासाठी, बँकांनीही प्रयत्न करावयास हवेत. बँका याबाबत विशेष प्रयत्न करीत नसल्याचेच सध्या चित्र सार्वत्रिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, कोणत्याही खात्यात जर १० वर्षे व्यवहार झाले नाहीत, तर अशा खात्यातील रक्कम 'डीईएएफ'मध्ये जमा करावयास हवी. बँका मात्र एखााद्या खात्यात दोन वर्षे व्यवहार झाले नसतील, तर ते खाते 'डॉरमन्ट' ठरतात.


बचत खाते, चालू खाते, रिकरिंग खाते, मुदत ठेव खाते व अन्य खाती व्यवहार न झाल्यामुळे 'डॉरमन्ट' होतात. बँका खाते 'डॉरमन्ट' झाल्यावर अशा खातेदारांशी संपर्क साधून त्यांना याची कल्पना दिली जाते. पण, बरेचदा खातेधारकांचे जुनेच तपशील बँकांकडे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता शकत नाही. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या कालावधीनंतर बँकांना 'डॉरमन्ट' खात्यातील निधी व्याजासह 'डीईएएफ'मध्ये वळता करावा लागतो. (अनक्लेम्ड) या पडून असलेल्या रकमेवर किती दराने व्याज द्यावयाचे, याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेते. बँक देत असलेल्या व्याजदराने व्याज मिळत नाही. रिझर्व्ह बँक साधारणपणे बचत खात्याच्या दराने व्याज देते. सध्याचा रिझर्व्ह बँकेचा मुदत ठेवींवर दिला जाणारा व्याजदर साडेतीन टक्के आहे.

 

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या 'अनक्लेम्ड' रकमेचा तपशील /संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवर टाकायला हवी. एखाद्याला वेबसाईटवर ही माहिती मिळाली, तर तर तो बँकेत जाऊन क्लेम फॉर्म भरून, मुदत ठेवीची रिसीट व केवायसी कागदपत्रे सादर करून सदर रक्कम मिळण्यासाठी दावा करू शकतो. हे पैसे मिळविण्यासाठी दावेदाराला स्वत: शाखेत व्यवहार करण्यासाठी जावे लागते. संगणक प्रणालीचा वापर करून हे व्यवहार करता येत नाहीत, कारण 'अनक्लेम्ड निधी' आपण योग्य व्यक्तीच्या हातात देत आहोत, याची बँकेस खात्री पटावयास हवी. कायदेशीर वारसदार जर पैसे मागण्यासाठी गेला असेल, तर त्याला मूळ खातेदाराच्या मृत्यूचा दाखला द्यावा लागतो. असा दावा बँकेने संमत केल्यानंतरच त्या महिन्याच्या अखेरीस बँकेस रिझर्व्ह बँकेकडे या पैशासाठी दावा करावा लागतो व त्यानंतर त्या बँकेत 'डीईएएफ'मधून निधी मिळतो.

 

'डॉरमन्ट' किंवा 'डीईएएफ'मध्ये निधी जमा झालेले खाते संबंधितांनी पैसे घेतल्यानंतर ते पूर्णपणे बंदही करता येते किंवा पुन्हा कार्यरतही करता येते. हे खाते कार्यरत करण्यासाठी बँका कोणतेही शुल्क आकारत नाहीत. कोणीही आपली गुंतवणूक व दायित्व यांची यादी तयार करून ठेवावी. 'डॉरमन्ट' खात्यात भर पडते, याचा अर्थ बरेच लोक आपल्या गुंतवणुकीबद्दल इतर कोणालाही माहिती देत नाहीत. किमान दोन जणांना तुमच्या गुंतवणुकीबद्दल, बँक खात्यांबद्दल संपूर्ण माहिती द्या. यापैकी एक व्यक्ती घरातील असावी, एक घराबाहेरची असावी. तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा तुमच्यानंतर योग्य माणसांना मिळावा, याची खबरदारी तुम्हाला घ्यायलाच हवी!

 

g.shashank25@gmail.com

@@AUTHORINFO_V1@@