नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत (सीएए) देशभर उठलेल्या वादावर आता भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सीएए विरोधात देशभरात सुरु असलेले आंदोलन ही दुखद बाब असल्याचे सांगत नडेला यांनी खंत व्यक्त केली आहे. बजफीड वेबसाइटचे संपादक बेन स्मिथ यांनी सोमवारी ट्वीट करत याची माहिती दिली.
By popular demand, here's the verbate pic.twitter.com/I8YcMDJsf8
— Ben Smith (@semaforben) January 13, 2020
स्मिथ यांनी सांगितले की, नडेला यांना सीएएवरून प्रश्न विचारला असता सत्या नडेला यांनी सांगितले की, "भारतात या कायद्याविरोधात जे काही होत आहे ते दुखद आहे. एखादा स्थलांतरित बांगलादेशी भारतात आला आणि येथे पुढची मोठी कंपनी उघडली किंवा इन्फोसिससारख्या कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी झाले तर मला आनंद होईल." स्मिथ यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, "मॅनहॅटनमधील मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात संपादकांशी झालेल्या संभाषणादरम्यान नडेला यांनी आपले मत व्यक्त केले. सत्या नडेला अमेरिकेतील भारतीय वंशाच्या दोन मोठ्या टेक नेत्यांपैकी एक आहे. त्यांच्याव्यतिरिक्त भारताचे सुंदर पिचाई गूगलचे सीईओ आहेत."
Statement from Satya Nadella, CEO, Microsoft pic.twitter.com/lzsqAUHu3I
— Microsoft India and South Asia (@MicrosoftIndia) January 13, 2020
“प्रत्येक देशाने आपल्या सीमा ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक देश आपले राष्ट्रीय सुरक्षा धोरण ठरवून त्याप्रमाणे निर्वासितांसाठी धोरणे ठरवतात. लोकशाहीमध्ये हे सर्व निर्णय त्या राष्ट्राचे लोक आणि तेथील सरकार, चर्चा आणि वादविवादाच्या माध्यमातून नियमांमध्ये राहून जातात. माझ्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. सांस्कृतिक वैविध्यता असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये जन्मल्यानंतर मी अमेरिकेमध्ये आलो. भारत हा असा देश हवा जिथे बाहेरच्या व्यक्ती येऊन एखादी कंपनी सुरु करतील आणि त्याची भरभराट होईल किंवा बाहेरुन आलेल्या व्यक्तीने सुरु केलेल्या कंपनीचा देशाला आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशी माझी इच्छा आहे,” असे नडेला यांचे म्हणणे मायक्रोसॉफ्ट कंपनीने जाहीर केले आहे.