नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांना 'राष्ट्रीय गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीस्थित इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा व त्रिपुरा आणि छत्तीसगढचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल के. एम. सेठ यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शालिनी या मेकॅनिकल इंजिनियर असून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय नेत्यांपैकी त्या प्रमुख नेत्या आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती पी. एन. भगवती, डॉ. धान सिंग, एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी, सुनील दत्त यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मूळच्या अयोध्येच्या असलेल्या शालिनी या भाजपच्या नव्या फळीतील तडफदार नेत्या आहेत. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या त्या कार्यकारी संचालिका आहेत. याशिवाय त्या एक यशस्वी उद्योजिका आणि गुंतवणूकदार आहेत. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या त्या सदस्यदेखील आहेत. तसेच उत्तर भारतीय परिवर्तन मंचाच्या त्या संस्थापक सदस्य असून मुंबईतील उत्तर भारतीय युवा वर्गासाठी व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम त्या राबवत असतात. या युवावर्गाच्या सशक्तीकरणासाठी त्या सदैव कार्यरत असतात. दरम्यान, त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.