रत्नागिरीतून 'फ्लॅटवर्म'च्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019   
Total Views |

 

'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या शास्त्रज्ञांचे शोधकार्य


मुंबई ( अक्षय मांडवकर ) - रत्नागिरीतील उंडी गावाजवळच्या समुद्रकिनाऱ्यावरून 'फ्लॅटवर्म' या समुद्री जीवांमधील नव्या प्रजातीचा उलगडा करण्यात आला आहे. ही नवी प्रजात 'स्टायलोस्टोमम' पोटजातीमधील असून उष्णकटिबंधीय पट्ट्यात प्रथमच या पोटजातीची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रत्नागिरीच्या किनाऱ्यालगत सापडलेल्या 'फ्लॅटवर्म'च्या आणखी चार प्रजातींपैकी 'युरिलेप्टा औरंटीयाका' ही प्रजात हिंदी महासागरात प्रथमच सापडली आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) सागरी जीवशास्त्रज्ञांना या प्रजातींचा उलगडा करण्यात यश मिळाले आहे.

 
 

 

 
खडकाळ समुद्रकिनारे आणि प्रवाळ परिसंस्थेत अधिवास करणाऱ्या 'फ्लॅटवर्म'चा समावेश 'पॉलीक्ल्याड' या वर्गामध्ये होतो. 'पाॅली' म्हणजे खूप (मेनी) आणि 'क्ल्याड' म्हणजे शाखा (बॅन्चेस). या वर्गात मोडणाऱ्या सागरी जीवांना अनेक शाखा आणि उपशाखा असणारे आतडे असतात. अतिशय गडद रंगाच्या छटा घेऊन वावरणाऱ्या या जीवांच्या काही प्रजाती अगदी सूक्ष्म असतात. त्या काही मिलीमीटर ते १५-२० सेंटीमीटरपर्यंतच वाढतात. अगदी एखाद्या पातळ पानासारखी, गोल, लंबवर्तुळाकार किंवा एखाद्या चपात्या फितीसारखे त्यांचे आकार असतात. 'पॉलीक्ल्याड'च्या जगभरात साधारण १,००० प्रजाती सापडतात. त्यातील भारतात केवळ ६३ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. आता 'पाॅलीक्ल्याड' वर्गामध्ये नव्या प्रजातीची भर पडली आहे. 'बीएनएचएस'च्या सागरी जीवशास्त्रज्ञ रेश्मा पितळे आणि संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले.
 

 
 

नव्याने सापडलेल्या 'फ्लॅटवर्म'चे नामकरण 'स्टायलोस्टोमम मिक्सटोमॅक्युलॅटम' करण्यात आल्याची माहिती संशोधिका रेश्मा पितळे यांनी 'मुंबई तरुण भारता'ला दिली. २०१२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील उंडी गावाजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर ही प्रजात आम्हाला सापडली होती. त्यानंतर तिच्यावर अभ्यास करुन जुलै २०१८ मध्ये या प्रजातीचा शोध निंबध आम्ही 'झूटॅक्सा'ला पाठविल्याचे त्यांनी सांगितले. या प्रजातीच्या पिवळसर-पांढऱ्या रंगाच्या शरीरावर गडद आणि फिक्या काळपट रंगांच्या ठिपक्याची सरमिसळ पाहावयास मिळते. म्हणूनच या नव्या प्रजातीचे नाव 'मिक्सटो' म्हणजे मिक्स (सरमिसळ) आणि 'मॅकुले' अर्थात ठिपके या अनुषंगाने ठेवल्याचे त्या म्हणाल्या. या प्रजातीचे नमुने साधारण ३ ते ४ मिलीमीटर आकाराचे आहेत. 'फ्लॅटवर्म'च्या या नव्या प्रजातीची चाचणी 'आकारशास्त्रा'च्या (माॅर्फोलाॅजी) आधारे करण्यात आली. यासाठी प्रजातीच्या बाह्यअंगपरिक्षणाबरोबरच अंतर्गत भागातील प्रजनन अंगाचे परिक्षण करण्यात आले. बाह्यअंगपरिक्षण त्यांच्या नेत्रकांची संख्या (आयस्पाॅट) आणि रंगवैशिष्ट्यांच्या आधारे केल्याचे पितळे यांनी सांगितले. 'स्टायलोस्टोमम' या प्रजातीमधील प्रत्येक प्रजातीच्या नेत्रकांची संख्या वेगवेगळी असते.

  

'पाॅलीक्ल्याड'चा १०० वर्षांनी अभ्यास

ब्रिटीश प्राध्यापक फ्रॅंक लेडलाॅ यांनी १९०२ मध्ये भारतात सर्वप्रथम 'पाॅलीक्ल्याड' प्रजातीच्या काही नोंदी केल्या होत्या. लक्षव्दीप बेटावरुन या प्रजातींची नोंद त्यांनी केली होती. त्यानंतर जवळपास १०० वर्षांहून अधिक काळाने २०११ मध्ये 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी भारतात 'पाॅलीक्ल्याड'च्या १० प्रजाती प्रथमच नोंदविल्या.

 
 
छोट्या अपृष्ठवंशीय जीवांचा अभ्यास करताना सिद्ध होते की, महाराष्ट्रातले खडकाळ किनारे हे एखाद्या प्रवाळ परिसंस्थेएवढेच महत्वाचे आहेत. खडकाळ किनाऱ्यावरील दगडाखाली अनेक गुपिते दडलेली आहेत. मागील काही वर्षांपासून 'बीएनएचएस' त्यांचा मागोवा घेत आहे. वरकरणी सूक्ष्म भासणाऱ्या या प्रजातींचा अभ्यास उपेक्षित राहिलेल्या किनाऱ्यांच्या संवर्धनासाठी महत्वाचा ठरेल. -  डाॅ. दिपक आपटे, संचालक, बीएनएचएस
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@