‘अमृतयात्रा’चे जनक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019
Total Views |



मानवी मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार्‍या विविध क्षेत्रातील माणसांच्या भेटी घडवणार्‍या सहली आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम राबविणार्‍या नवीन काळे यांच्याविषयी जाणून घेऊया...

 

‘’मी संपूर्ण जग फिरलो. नद्या पाहिल्या, पर्वत पाहिले. त्यासाठी पैसेही खर्च केले. अशा या माझ्या या अविरत भ्रमंतीत मी खूप काही पाहिले आणि अनुभवले. पण, माझ्या घराच्या बाहेर, गवताच्या पात्यावर पडलेल्या या दवबिंदूला पाहायला मी मात्र विसरलो. दवबिंदू... ज्यात या संपूर्ण विश्वाचे प्रतिबिंब पडलंय!रवींद्रनाथ टागोर यांचे हे विचार...टागोरांच्या कवितेनुसार आपण जग फिरायला जातो. मात्र, आपल्या अवती-भवतीच अनेक माणसे असतात. अशाच अनोख्या माणसांची भेट घडवणारी सहल आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम मुंबईचे नवीन काळे गेल्या काही वर्षांपासून राबवत आहेत. तसेच, समाजासाठी चांगलं काम करणार्‍या व्यक्तींचे प्रेरणादायी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयनावाचा व्याख्यान-मुलाखतीचा उपक्रमही त्यांनी सुरू केला आहे. सत्कार्यासाठी हजारो हातांची साखळी तयार व्हावी, हा या समाजकार्यमागचा उद्देश.

 

२००८ मध्ये खाजगी नोकरीतून निवृत्त झालेले अनिल काळे पत्नीसह प्रथमच आनंदवनला गेले होते.आनंदवनअनुभवून ते वेगळ्याच विचारांनी भारावून परत आले. घरी परतल्यावर त्यांनी आपल्या मनातली कल्पना मुलगा नवीन आणि सून स्नेहल यांना सांगितली. मला किमान एक हजार लोकांना आनंदवनदाखवायला घेऊन जायचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी ते बघायलाच हवं,” असं ते म्हणाले. नवीन काळे यांना त्यांच्या वडिलांच्या मनातली ही कल्पना प्रचंड आवडली. लोकांना नि:स्वार्थ समाजसेवा करणारी माणसे पाहून, त्यांच्याशी बोलून नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल, मनावरची मरगळ जाऊन नवीन उत्साह वाटेल, असा विश्वास वाटून नवीन काळे यांनी वडिलांच्या कल्पनेला मूर्त रूप देण्याचे ठरविले. प्रारंभी चारधाम यात्रेसारखीच यात्रा काढायची असे ठरले. त्यांनी आपल्या संस्थेचे वेगळेपण अधोरेखित करणारी सोशल टुरिझमसंकल्पनेवर आधारित जाहिरात तयार करायचे ठरवले आणि संस्थेचे नाव ठेवले अमृतयात्रा.अशा स्थळांची यात्रा की, जिथे गेल्यावर मनावरील ताणतणावाची जळमटं दूर होऊन मनाला नवसंजीवनी मिळेल. पुढचे काही महिने त्या दृष्टीने आखणी करण्यात गेले. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून विविध स्थळांचा अभ्यास केला. एक दिशा निश्चित केली की, आपण ही एनजीओकाढायची नाही, तर व्यवस्थित व्यावसायिक हेतूने, स्वयंपूर्ण व्यवसाय म्हणूनच करायचा आणि महाराष्ट्रातल्या माणसांची समाजासाठी अतिशय चांगले काम करणार्‍या माणसांशी भेट घडवून आणायची. अशा अपरिचित माणसांना भेटायला लोक येतील का,’ ‘सोशल टुरिझम म्हणजे काय,’ असे असंख्य प्रश्न त्यांना विचारले जाऊ लागले. या प्रश्नांमुळेच नवीन काळे यांची खात्री पटली की, ते योग्य मार्गावर आहेत आणि अखेरीस जानेवारी 2009 साली त्यांनी आयोजित केलेली पहिली सहल आनंदवनात दाखल झाली.

 

सुरुवातीला नवीन यांनी राहत्या घरातच कार्यालय सुरू केले. मग पुढे विलेपार्ले येथे कार्यालय स्थापन करून तेथून कामाला सुरुवात केली. पुढील काही वर्षांमध्येच नवीन काळे यांनी नोकरीही सोडली आणि पूर्ण वेळ व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आनंदवन, राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, शांतिवन, स्नेहालय, सावली, विज्ञान आश्रम, मेळघाट, चिखलदरा, गांधीतीर्थ-जळगाव, अजिंठा लेणी, आर्यन इको रिसॉर्ट, मनोबल, जयपूरचे बेअरफूट कॉलेज, चित्रकूट, खजुराहो अशा सुंदर आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा देणार्‍या ठिकाणच्या सहली सुरू झाल्या. अनेकांनी न पाहिलेली मुंबईची सैर ज्यात फोर्ट परिसर, जहांगिर आर्ट गॅलरी, कान्हेरी गुंफा, इतकेच नव्हे तर बर्‍याच मुंबईकरांनाही माहीत नसलेले मुंबईतले सात किल्लेअशा ठिकाणांचा समावेश असलेली मुंबई सिटी टूरत्यांनी सुरू केली. हळूहळू अमृतयात्राला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळायला लागला. काळे यांचा अनुभव असा आहे की, आनंदवन बघायला जाताना जी तरुण मुले हातात मोबाईल, टॅब घेऊन किंवा अंताक्षरी खेळत जातात, त्यांच्यामध्ये तिथून परत येताना बदल झालेला दिसतो. परतीच्या प्रवासात ती विचार करताना दिसतात, अंताक्षरी बंद झालेली असते.

 

एक निरंतर प्रवास.... स्वतःच्याच शोधाचाहे अमृतयात्राचे घोषवाक्य. नवीन काळे यांना जाणवलं की, समाजात सामान्य माणसांमध्ये अशी काही असामान्य माणसे आहेत की, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतरांच्या जीवनात परिवर्तनाची पहाट प्रकाशित केली. त्यापैकी काही व्यक्तिमत्त्वांचे कर्तृत्व माध्यमांतून घरोघरी पोहोचले, तर अजून अशा शेकडो समाजशील चेहर्‍यांचा अनेकांना परिचयच नाही. म्हणूनच मग अशा पडद्यामागे राहून समाजसेवा करणार्‍या लोकांना समाजपटलावर आणण्याचे नवीन काळे यांनी ठरवले. त्यासाठी स्वयनावाचा एक आगळावेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. विविध क्षेत्रांत अत्यंत प्रेरणादायी कार्य करणार्‍या मंडळींना या कार्यक्रमाद्वारे लोकांशी बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्या माध्यमातून आपले विचार आणि कार्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी त्यांना बोलण्याची संधी दिली जाते. पहिल्या वर्षी खूप आर्थिक नुकसान होऊनही हा सकारात्मक उपक्रम लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, या निश्चयाने नवीन काळे आणि त्यांच्या चमूने हा कार्यक्रम सुरूच ठेवला. धीम्या गतीने का होईना, लोकांपर्यंत नवीन काळे यांचा कार्य पोहोचत आहे, हीच खरी त्यांच्या कामाची पोचपावती...!

 

- कविता भोसले

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@