कर्तृत्ववान मोहिनी

    12-Sep-2025
Total Views |

खेळण्या बागडण्याच्या वयात घराला हातभार लावत, विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान मोहिनी अतुल भगरे यांच्याविषयी...

मोहिनी अतुल भगरे यांचा जन्म दि. १७ नोव्हेंबर १९७० रोजी मिग विमानांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि त्यावरूनच नाव पडलेल्या, नाशिक जिल्ह्यातील ओझर मिग येथे झाला. बालपणापासूनच चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या मोहिनी यांचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जन्मगावीच पूर्ण झाले. घरातील बेताच्या परिस्थितीमुळे कळत्या वयापासूनच त्यांनी आपल्या घराला हातभार लावला. अगदी चौथी-पाचवीपासूनच त्यांनी शिलाई काम सुरु केले. मोहिनी यांच्या आई शिक्षिका होत्या परंतु, काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यादरम्यानच त्यांच्या वडिलांचीही नोकरी अचानक सुटल्याने, संपूर्ण घरावरच उपासमारीची वेळ आली. घरची परिस्थिती हलाखीची असली, तरी मोहिनी यांच्यासह त्यांची सर्व भावंडे अभ्यासात खूपच हुशार होती. शालेय शिक्षण घेत असताना, मोहिनी यांनी कधीच आपला पहिला क्रमांक सोडला नाही. याशिवाय शाळेमध्ये मोहिनी यांचे स्नेहसंमेलने, नाटक, वक्तृत्वस्पर्धा, निबंधस्पर्धांमध्ये बक्षीस ठरलेले असायचे. त्यांना मराठी साहित्यातील मैलाचे दगड असणारे कवी नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते, बक्षीस स्वीकारण्याचे भाग्य लाभले. बारावीच्या परीक्षेत ओझर केंद्रात प्रथम आल्यानंतरही मोहिनी यांना, अशाच थोर व्यक्तिमत्त्वाकडून पाठीवर शाबासकीची थाप पडल्याचेही त्या आवर्जून सांगतात.

हुशार असूनही घरच्या नाजूक परिस्थितीमुळे, डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला ठेवून शिक्षण क्षेत्रात जाण्याचा निर्णय मोहिनी यांनी घेतला. या प्रवासात मराठा कॉलेजचे प्राध्यापक रामदास अहिरे यांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावरच मोहिनी यांनी ‘डीएड’साठी प्रवेश घेतला. शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर मोहिनी यांचा विवाह, नाशिकमध्ये वैदिक क्षेत्रात मोठे प्रस्थ असलेले अतुलशास्त्री भगरे यांच्यासोबत झाला. सासरीदेखील मोहिनी यांची परिस्थिती सुरुवातीच्या काळात मध्यमवर्गीयांप्रमाणे सर्वसाधारणच अशीच. परंतु, पतीच्या विद्वत्तेमुळे महाराष्ट्रभर त्यांचा नावलौकिक झाला आणि त्यासोबत संपन्नतादेखील घरात आली.

आपला संसार नेटाने करणाऱ्या मोहिनी यांनी, नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना संधी चालून आल्याने, मालिकामंध्येही त्यांनी आपली छाप पाडली. एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘प्रीतीचा वनवा उरी पेटला’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘जय योगेश्वर भगवान’, ‘क्राईम डायरी’ या मालिकांबरोबरच, ‘जीआर एक नवी सुरुवात’, ‘दुर्गा’, ‘अवतार’, ‘खेळ’ यांसारख्या शॉर्टफिल्ममध्येही मोहिनी यांनी भूमिका साकारल्याआहेत. तसेच ‘मृगजळ’, ‘मुंगी उडाली आकाशी’, ‘दीक्षा’, ‘साधू-संत येती घरा’ या राज्यस्तरीय नाटकांतही त्यांनी काम केले आहे.

दरम्यानच्या काळात शिक्षणात केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून, मोहिनी यांना ‘आदर्श शिक्षका पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. चतुरस्त्र असलेल्या मोहिनी यांनी, सूत्रसंचालक म्हणून प्रेषकांना मंत्रमुग्ध करत तेथेही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या या कामाची कदर करणार्या अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. अभिनय करतानाच मोहिनी यांनी दिग्दर्शन क्षेत्रात उडी घेतली. आज बालनाट्य दिग्दर्शक म्हणून अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. यासोबतच त्यांनी लहान मुलांसाठीही अनेक बालनाट्ये लिहिली आहेत. त्यांच्या अनेक बालनाट्यांना मिळालेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणजे, मनापासून केलेल्या कामाची पोचपावतीच असल्याचेच मोहिनी सांगतात. त्यांच्या कामाची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांनी पदाधिकारी म्हणूनही, त्यांची नेमणूक केली आहे. सामाजिक कार्याची आवड असणार्या मोहिनी यांनीही, अनेक गरीब विद्यार्थ्यांना आजवर मदत केली आहे. आतापर्यंत मोहिनी यांना ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून १८ पुरस्कारांबरोबरच ’हिरकणी’, ’समाजभूषण’, ’नारीरत्न’, ’ज्योतिर्विद्या’, ’उत्तम अभिनेत्री’, ’उत्तम सूत्रसंचालिका’, ’काव्यकुंज’, ’सखी सम्राज्ञी’, ’कर्तृत्ववान महिला’, ’कर्तृत्ववान मातृत्व’, ’समाजरत्न’, ’नाट्यदिग्दर्शिका’, ’नृत्यदिग्दर्शन’ आणि जीवनगौरव पुरस्कारांनी मोहिनी यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. आतापर्यंत मोहिनी यांनी देश-विदेशातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देत, त्यांची माहिती जाणून घेण्याची एक आगळीवेगळी आवड जोपासली आहे. तर सामाजिक कार्याला हातभार लावताना महिलांसाठी चर्चासत्र, उद्बोधन वर्ग आणि शिबिरांचे आयोजन करत त्या मार्गदर्शनही करतात. सध्या त्या स्वराज्य परिवारातील संस्थेवर महिला अध्यक्ष, ब्राह्मण संस्थेत पदाधिकारी, भारत-तिबेट सहयोग मंच महिला प्रमुख म्हणून आपली सेवा देत आहेत. आपल्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल ३६ वर्षे विद्यादानाचे काम केलेल्या मोहिनी यांचे, अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रे आपल्या कार्यकर्तृत्वाने उजळवत आहेत. मोहिनी भगरे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!

विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८