पेपर तपासणीत घोळ; पुनर्तपासणीनंतर १३७१ विद्यार्थी पास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019
Total Views |


 


प्रथम तपासणीत नापास का केले? विद्यार्थ्यांचा संतापजनक सवाल

 

जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील दुसर्‍या सत्रात मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर पेपर पुनर्तपासणीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांचे पेपर पुन्हा तपासले असता तब्बल १३७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या वेळी पेपर तपासले गेले तेव्हा नापास का केले? असा सवाल आता विद्यार्थी विचारत आहेत.

 

मार्च, एप्रिल महिन्यात विद्यापीठाची परीक्षा झाली होती. याचा निकाल मे महिन्यात लागला. यावेळी ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले किंवा जे नापास झाले होते, अशा विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज केले होते. यापैकी एस.वाय,व टी.वाय बी.एस.सी चा निकाल जाहीर झाला असून एस.वाय बी.एस.सी मधील २०५९ विद्यार्थ्यांपैकी ७३९ विद्यार्थी, तर टी.वाय बी.एस.सी मधील १५९६ पैकी ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. म्हणजेच दोन्ही वर्षातील अनुक्रमे ३५.८९ टक्के व ३९.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इतर विभागातील निकालही टप्प्याटप्प्याने लागण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे प्रथम पेपर तपासणी प्रक्रियेविषयी आता शंका उपस्थित होत आहे.

 

यापूर्वीही झाला होता असाच घोळ

 

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रातही असाच घोळ झाला होता. प्रथम तपासणीत १० पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थीदेखील पेपर पुनर्तपासणी झाल्यावर उत्तीर्ण झाले होते. प्रथम तपासणीत नापास परंतु पुनर्तपासणीत पास असे ४० टक्के निकाल समोर आले होते. यावरून विद्यापीठाच्या अधिसभेत चांगलाच गोंधळ झाला होता. परंतु कुलगुरू महोदयांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही व झाल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. परंतु पुढच्याच सत्रात विद्यापीठाचा पुन्हा हा भोंगळा कारभार उघडा झाल्यामुळे विद्यापीठाची पेपर तपासणी प्रक्रिया सदोष असून यामागे विद्यापीठातील पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांचा निष्काळजीपणा असल्याचे आता निष्पन्न होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे असंतोष निर्माण झाला आहे.

 

उर्वरित सर्व अभ्यासक्रमांचे पुनर्मूल्यांकनाची निकाल जाहीर झाल्यास हे प्रमाण ५० टक्के पर्यंत देखील जाऊ शकते. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण बघता प्रथम पेपर तपासणी पद्धतीत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे व यावरून पेपर तपासणी यंत्रणेवर विद्यापीठ प्रशासनाचा कुठलाही अंकुश राहिला नसल्याची खंत सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी व्यक्त केली आहे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@