मुंबई : रेल्वे ही मुंबईकरांची एक लाईफलाईन आहे असे म्हटले जाते. या रेल्वेच्या परिसरात कित्येक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. भारतीय रेल्वेने असेच एक चांगले पाऊल उचलत नुकतेच एका लोगो मधील बदलाने समाजातील एका मोठ्या बदलाचा संकेत दिला आहे. रेल्वेच्या महिला वर्गाच्या कोचवरील एका साडी नेसलेल्या, पारंपरिक वेशातील महिलेचा फोटो बदलून एका सूट बूट घातलेल्या, कामगार वर्गातील महिलेचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे.
बदलाची सगळ्यांनाच गरज असते मात्र या छोट्या छोट्या बदलांनीच समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि समाजाची विकासाच्या दिशेने वाटचाल होते. महिला आणि पुरुषांना सामान वागणूक, सामान कायदे, सामान न्याय या सगळ्या गोष्टी मिळण्यास सुरुवात झाल्याचेच हे एक लक्षण आहे असे म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे या रेल्वेमधून रोज प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने जरी हा नवीन लोगो बघून मनाशी निर्धार केला की 'आजपासून मी स्त्री-पुरुष समानतेचे आचरण करेन' तर त्या सारखी आनंदाची गोष्ट नसेल.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रेल्वेवरील केवळ लोगोच नाही तर महिला डब्यांचा संपूर्ण आतील भाग बदलला जाईल. महिला डब्यांमध्ये अंतराळात जाणारी पहिली महिला कल्पना चावला तसेच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि क्रिकेटपटू मिताली राज यांच्यासारख्या खंबीर आणि कर्तृत्ववान महिलांची पोस्टर्स असतील. महिलांना रेल्वेमध्ये चढताना महिलांचा डबा पटकन ओळखता यावा यासाठी या नवीन लोगोचा आकार तुलनेने मोठा ठेवण्यात आला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat