'सिटीझन सायन्स' म्हणजे काय रे भाऊ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2019
Total Views |



आज जगावर माणसाची मक्तेदारी असून तो जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आर्थिक आणि औद्योगिक विकासाबरोबर वाढत्या लोकसंख्येचा परिणाम निसर्गावर होत आहे. मात्र, या परिणामाचे मोजमाप नाही. मानवी हस्तक्षेपातून होणारी जंगलतोड, मातीची झीज, वाढते प्रदूषण याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व विषयांवर तज्ज्ञ मंडळी तर काम करत आहेतच, पण सध्या त्यावर पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मग अशावेळी सामान्य माणसेसुद्धा तज्ज्ञ मंडळींना त्यांच्या कामात हातभार लावू शकतात किंवा त्यांच्या संशोधनात सहभागी होऊ शकतात, 'सिटीझन सायन्स'या उपक्रमाद्वारे...

 

. 'सिटीझन सायन्स' म्हणजे काय?

 

सामान्य लोकांनी निसर्गात अथवा इतर वैज्ञानिक विषयात केलेली कोणत्याही स्वरूपातील निरीक्षणे, नोंदी त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींच्या पुनरावलोकनानंतर इंटरनेट किंवा डिजिटल स्वरूपात सर्वांना सहजरीत्या पाहता येतील, अशा स्वरूपात जतन करणे म्हणजे 'सिटीझन सायन्स' होय.

 

. 'सिटीझन सायन्स'मध्ये कोणाचा सहभाग असतो?

 

यात मुख्य सहभाग हा सामान्य लोकांचा असतो. त्यात हौशी छायाचित्रकार, विद्यार्थी, निसर्गमित्र यापासून व्यावसायिक छायाचित्रकार, नामवंत शास्त्रज्ञ अशा सर्वांचा समावेश होतो.

 

. 'सिटीझन सायन्स'चे काम कसे चालते?

 

सर्वप्रथम एका ठराविक विषयाला अनुसरून एक सामाईक डेटाबेस बनवला जातो (उदाहरणार्थ : सस्तन प्राणी, उभयचर आणि सरीसृप, झाड, कीटक इ). तो ऑनलाईन किंवा ऑफलाईनही असू शकतो. परंतु, ऑनलाईन डेटाबेस जास्त सोयीस्कर असतात. त्या डेटाबेसवर सामान्य लोक, विद्यार्थी, निसर्गमित्र, शास्त्रज्ञ असे कोणीही त्यांच्या नोंदी, निरीक्षणे, फोटो पाठवू शकतात. अशी सर्व निरीक्षणे त्या विषयातील तज्ज्ञ लोकांसमोर ठेवली जातात. तज्ज्ञ मंडळी त्या नोंदीची तपासणी करते आणि योग्य तेथे बदल सुचवते. यानंतर या सर्व नोंदी, निरीक्षणे, फोटो या ऑनलाईन डेटाबेसवर प्रसिद्ध केले जातात जे सर्वांसाठी बहुधा मोफत उपलब्ध असतात.

 

. 'सिटीझन सायन्स'चे फायदे कोणते?

 

* वैज्ञानिक माहिती जी पूर्वी फक्त शास्त्रीय शोधपत्रिकांमध्ये (सायंटिफिक जर्नल) प्रसिद्ध व्हायची ती यामुळे सर्व लोकांसाठी सहज आणि बहुतकरून मोफत उपलब्ध आहे.

* या डेटाबेसकरिता कोणीही माहिती पाठवू शकतो. यासाठी त्या व्यक्तीला शास्त्रज्ञ किंवा व्यावसायिक छायाचित्रकार असण्याची गरज नाही.

* एखाद्या विषयासंबंधी (उदा. पक्षी) सर्व निरीक्षणे एकाच छताखाली उपलब्ध होतात. त्यातही कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, किती प्रकारच्या जाती आढळल्या, याची माहिती लगेच उपलब्ध होते.

* ऑनलाईन डेटाबेस असल्याने ही सर्व माहिती नष्ट होण्याची शक्यता फार कमी असते.

* ही सर्व माहिती कधीही आणि कितीही वेळा वापरता येते.

* ज्या व्यक्तीने एखादी नोंद किंवा छायाचित्र पाठवले असेल. त्या व्यक्तीच्या नावे त्या नोंदीचा किंवा छायाचित्राचा स्वामित्वहक्क (कॉपीराईट) राहतो.

* सामान्य लोकांना कळेल आणि रुचेल अशा भाषेत हा सर्व डेटाबेस असल्याने सामान्य लोकांचा जास्तीत जास्त सहभाग या प्रकल्पात असतो. सामान्य लोकांमध्ये त्या-त्या विषयाची जनजागृती होते.

* अनेक विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी 'सिटीझन सायन्स' ही एक चांगली सुरुवात असते.

* अनेक नवीन आणि दुर्मीळ निरीक्षणे 'सिटीझन सायन्स'च्या निमित्ताने जगासमोर येतात आणि त्यांचे अस्तित्व टिकून राहते.

* एखाद्या विशिष्ट जागी आढळून येणाऱ्या जैवविविधतेची माहिती, तिच्यात होणारे बदल पाहता येतात. त्याची खात्रीशीर नोंद राहते. ज्यामुळे भविष्यात त्यावर उपाययोजना तसेच जैवविविधता संरक्षणाचे काम करता येते.

* एखाद्या प्राण्याचे किंवा फुलाचे छायाचित्र काढण्यासाठी डिजिटल कॅमेऱ्याचीच गरज असते असे नसून तुम्ही मोबाईलवरसुद्धा छायाचित्र काढून ते 'सिटीझन सायन्स वर जतन करू शकता.

 

 
 

'सिटीझन सायन्स'चे तोटे कोणते ?

 

. दुर्मीळ वन्यजीवांची छायाचित्रे जेव्हा लोकांसमोर येतात तेव्हा अशा माहितीचा दुरूपयोग तस्करीकरिता होऊ शकतो. पण म्हणून 'सिटीझन सायन्स' अयोग्य ठरते का?नाही. उलट या उपक्रमाद्वारे अशा विशिष्ट ठिकाणांवर अधिक कडक कायदे अंमलात आणण्यावर भर दिला जाऊ शकतो.

 

. फोटोच्या आधारे एखाद्या प्राण्याची/पक्ष्याची/वनस्पतीची जात किंवा पोट जात सांगणे काही वेळा अवघड असते.

 

. एखाद्या फोटोची माहिती ही तो फोटो पाठवणाऱ्याकडून चुकीच्या पद्धतीने दिली जाऊ शकते.

 

. 'सिटीझन सायन्स'ची उदाहरणे

 

* Biodiversity Atlas and Allied websites (https://www.bioatlasindia.org/)

www.ifoundbutterflies.org

www.indianodonata.org

www.mothsofindia.org

www.birdsofindia.org

www.reptilesofindia.org

www.mammalsofindia.org

* Indian Biodiversity Portal (IBP): https://indiabiodiversity.org/

Globally:

ebrid : https://ebird.org/india/home

iNaturalist : https://www.inaturalist.org/

* फेसबुकवरील विविध ग्रुप (butterfliesofindia, dragonflyindia, flowersofindia, SpiderInda)

 

. 'सिटीझन सायन्स'चा जैवविविधता संवर्धनामध्ये काय उपयोग आहे?

 

'सिटीझन सायन्स' ही एक प्रकारची चळवळ आहे. कारण, यामध्ये प्रसिद्ध झालेला डेटाबेस हा सर्व लोकांना पाहता येतो. त्यामुळे एखाद्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागी कोणकोणत्या प्रकारची जैवविविधता आढळून येते याची सर्व माहिती मिळते. पूर्वी हीच माहिती सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जायचा. मात्र, आता 'सिटीझन सायन्स'मुळे हे काही दिवसातच शक्य झाले आहे. एकदा ही माहिती प्रसिद्ध झाली की, एखादी विशिष्ट जागा पर्यावरणदृष्ट्या का संवेदनशील आहे, याचे उत्तर पुराव्यानिशी मिळते. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे संशोधक अजूनही पोहोचलेले नाही. अशी ठिकाणे 'सिटीझन सायन्स'च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशा जागा कायद्याने सुरक्षित करता येऊ शकतात. अशा जागी होऊ घातलेले प्रकल्प किंवा विकासकामे रोखता येतात. नाहीतर सरकारी यंत्रणा ती जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नाही असे दाखवून आपले प्रकल्प पुढे रेटू शकते. शिवाय एखाद्या अभयारण्यात किती समृद्ध जैवविविधता आहे, याची इत्यंभूत माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने त्या अभयारण्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण कायदेशीररीत्या रोखता येते. तसेच मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे जैवविविधतेचे होणारे नुकसान या डेटाबेसवर पाहता येते. 'सिटीझन सायन्स'मधून आपल्याला खूप माहिती समजून घेता येते.

 

उदाहरणार्थ : एखाद्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागेवर विकास प्रकल्पामुळे झालेला बदल, त्याचा तेथील जैवविविधतेवर काय परिणाम होतो आहे, हे तपासता येते. जेणेकरून भविष्यात अशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागेवर विकास प्रकल्प होण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे हे समजून घेता येते. आरे कॉलनीचा लढा हे 'सिटीझन सायन्स'द्वारे जैवविविधता संवर्धन करण्याच्या लढ्याचे उत्तम उदाहरण आहे. सरकारने आरे कॉलनीमध्ये विविध प्रकल्पांचा घाट घातला असताना आरे कॉलनीमध्ये किती समृद्ध जैवविविधता आहे, याची नोंद 'biodiversity atlas' आणि 'India Biodiversity Portal' संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. उदाहरण म्हणजे मुंबई शहरात असलेल्या 'हँगिंग गार्डन'मध्ये फुलपाखरांच्या १००हून अधिक प्रजाती असल्याची नोंद www.ifoundbutterflies.org या संकेतस्थळावर आहे. शहरी प्रदूषण असूनही मलबार हिलच्या ज्या भागात अजूनही जंगल टिकून आहे तेथे फुलपाखरे असणे म्हणजे त्या भागातील हवा अजूनही उत्तम असल्याचे द्योतक आहे. मात्र, मुंबईच्या इतर भागात पूर्वी आढळणाऱ्या या प्रजाती कमी होणाऱ्या झाडांबरोबर नाहीशा झाल्या आणि फक्त ठराविक भागापुरत्या मर्यादित राहिल्या हे वास्तव 'सिटीझन सायन्स'मुळे अधोरेखित झाले आहे. अजून एक उदाहरण म्हणजे मुंबई किनारपट्टीलगत असलेल्या सागरी जलचर प्रजातींची नोंद ही 'inaturalist' या संकेतस्थळावर करण्यात आली. त्यामुळे मुंबई किनारपट्टीलगत असलेल्या सागरी जलचर प्रजातींची जैवविविधता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. आजच्या काळात मोबाईल, कॅमेरा अशी उपकरणे जवळपास सर्वांकडे उपलब्ध असतात. आवड म्हणून काढलेली छायाचित्रे नुसती साठवून ठेवण्यापेक्षा जर ती छायाचित्रे किंवा माहिती 'सिटीझन सायन्स' उपक्रमाद्वारे जतन केली, तर निसर्गातील सर्व प्रजाती पुढील पिढ्यांकरिता वाचवता येऊ शकतील.

  

- दत्तप्रसाद सावंत, राजेश सानप

(लेखक वन्यजीव संशोधक आहेत)

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@