कानपूर : उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले. कानपुर येथील रूमा गावाजवळ मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या रेल्वे अपघातात १० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. घटनेनंतर वाचाव पथक वेळेत दाखल झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
पूर्वा एक्सप्रेस (१२३०३) ही हावडा येथून नवी दिल्लीला जात होती. शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कानपूरपासून १५ किलोमीटर असलेल्या रुमा गावाजवळ या ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरले. यात तब्बल ९०० प्रवासी प्रवास करत होते. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या ४५ जणांची तुकडी घटनास्थळी वेळीच पोहोचली. त्यानंतर त्यांनी बचाव कार्याला सुरुवात करत डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या दुर्घटनेनंतर या मार्गावरून चालवल्या जाणाऱ्या ११ ट्रेन आज रद्द करण्यात आल्या आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat