मुंबई : सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उदघाटन ५ मार्च रोजी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. तसेच यावेळी मत्स्यबीज केंद्र उदघाटन, मासेमारी बंदराचे भूमिपूजन, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मालकीचे घर वाटप, सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण , देवगड पवनचक्कीचे लोकार्पण, चांदा ते बांदा योजने अंतर्गत मच्छीमार बांधवांना जाळी वाटप तसेच बंधाऱ्याचे भूमिपूजन, विक्रमी तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार, श्रमयोगी योजना लाभार्थी कार्ड वाटप, प्रधानमंत्री किसान योजना लाभार्थी प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम ही केले जातील.
विविध विमान वाहतूक कंपन्यांनी सदर विमानतळावरून सेवा देण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. उडान योजने अंतर्गत सिंधुदुर्ग, पुणे आणि मुंबई, नाशिक यांना जोडणारे मार्ग मंजूर केले गेले आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विमानतळ सुरु झाल्याने उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रचे विमानतळ जोडले जाऊन सुंदर किनारपट्टी लाभलेल्या कोकण क्षेत्रातील प्राचीन मंदिर आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे पर्यटन सुलभ होईल तसेच कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा भागाचा विकास होण्यास मदत होईल.
येत्या काळात कार्गो हब आणि कोकणातील बंदरे या विमानतळाशी जोडण्याचा मानस असून चिप्पी विमानतळावरून हवाई वाहतूक (उडान योजना) लवकरच सुरू होईल.
· प्रकल्पाची एकूण किंमत ५२० कोटी रुपये
· नव्याने बांधलेल्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रतितास ४०० प्रवासी आणि वार्षिक १० लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.
· एअरवेजची रनवे लांबी २५०० एम एक्स ४५ एम आहे, जी ए ३२० आणि ७३७ प्रकारच्या विमानासाठी उपयुक्त आहे.
· एप्रॉन, टॅक्सीवे, आयसोलोशन बे आणि सीमा भिंत पूर्ण झाली आहे.
· फायर स्टेशन आणि इतर संबंधित सुविधा पूर्ण केल्या आहेत. सुरक्षा केबिन आणि वॉच टॉवर देखील पूर्ण झाले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat