परांजपेंना पाठिंबा देण्यावरून मतभेद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 


ठाणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वरकरणी आघाडी झाली असली तरी, ठाण्यातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्याच दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शहराध्यक्ष शिंदे यांच्या गटाने परांजपे यांच्या विरोधात भूमिका घेतली असताना पूर्णेकरगटाने मात्र परांजपे यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. काँग्रेसमधील या घोळामुळे आनंद परांजपे यांना शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्याविरोधातील ही लढत कठीण जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका याअगोदरच घेतली आहे. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीही अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हा अहवाल सादर करण्यापूर्वीच पूर्णेकरगटाने शहराध्यक्षांविरोधात भूमिका घेऊन आनंद परांजपे यांना आपला पाठिंबा असल्याचे परस्पर जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रीयस्तरावर भाजपसमोर काँग्रेसचे सर्व डावपेच अपयशी ठरत असल्याने सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा खटाटोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.

 

असे असताना ठाण्यात मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला मदत होईल, अशा पद्धतीने काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. ही भूमिका पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातील भूमिका आहे, असे काँग्रेसच्या पूर्णेकर गटाचे म्हणणे आहे. वैयक्तिक फायद्यासाठी काँग्रेसमधील काही अंतर्गत गट शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका घेत असल्याचा आरोप पूर्णेकर गटाने केला आहे. या गटाने आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर ठाणे काँग्रेस पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही पूर्णेकर गटाने परांजपे यांना दिल्याचे समजते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@