हजारो सापांना जीवदान देणारा अवलिया सर्पमित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |


 

शहापूर (प्रशांत गडगे) : साप म्हटल्यावर शहरी माणसाच्या अंगावर भीतीने काटा येतो, तर ग्रामीण भागात त्याला एकतर देवत्व देऊन अंधश्रद्धा निर्माण झालेल्या असतात किंवा थेट जीवाच्या भीतीने त्याला मारून टाकले जाते. आपल्याकडची सापाबद्दलची एकंदरीत भावना ही अशी आहे. आपण शाळेत शिकतो की, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो पिकाची नासाडी करणारे उंदीर मारून खातो वगैरे वगैरे. पण, तरीदेखील एखाद्या सहलीला गेल्यावर अथवा घरी साप दिसल्यावर त्याला मारण्याकडेच आपला कल असतो. तरीही गेल्या काही वर्षांमध्ये या बाबतीत बरीच जनजागृती झाली आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांनी आणि सर्पमित्रांच्या माध्यमातून सापांबद्दलची भीती बऱ्यापैकी कमी होत असली तरी सापाबद्दल सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे.

 

शहापूरमध्ये राहणारा देवेन रोठे हा ३० वर्षीय युवक गेल्या सहा-सात वर्षांपासून शहापूर तालुक्यात 'सर्पमित्र' म्हणून काम करीत आहे. लहानपणापासून सापांबद्दलचे कुतूहल त्याला या क्षेत्रात घेऊन आले. शहापूर ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. चारही बाजूस सह्याद्रीच्या डोंगरकडांनी वेढलेल्या तालुक्यात निसर्गाने नैसर्गिक साधन संपत्तीची उधळण केली आहे. तानसा, वैतरणा आणि भातसा अशी तीन मोठी जलाशये. तानसा अभयारण्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगली भाग आहे. त्यामुळे विविध प्राणी, पक्ष्यांबरोबरच अनेक वेगवेगळ्या जातीच्या सापांचाही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुक्त संचार पाहावयाला मिळतो. त्यामुळे साहजिकच अनेक खेड्यांमध्ये रोज साप दिसण्याच्या घटना घडत असतात. तसेच सापांबद्दल असलेल्या गैरसमजुतीतून, भीतीपोटी त्यांना ठार मारण्याचे प्रकार होत. पण, गेल्या काही वर्षांपासून देवेन रोठे याच्या साप पकडून त्याला योग्य ठिकाणी सोडण्याच्या छंदामुळे 'हजारो सापांना जीवदान देणारा सर्पमित्र' म्हणून शहापूर तालुक्यात नवी ओळख निर्माण केली आहे.

 

आपला खाजगी व्यवसाय सांभाळून गेली अनेक वर्षे देवेन शहापूर तालुक्यात 'सर्पमित्र' म्हणून काम करीत आहे. शहापूर तालुक्यातील कुठल्याही ठिकाणी जर साप आढळल्याचे देवेनला कळले तर शक्य तेवढ्या लवकर त्या ठिकाणी पोहोचून सापाला इजा न करता पकडून माहुली किल्ल्याच्या सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम तो करत असतो. आजपर्यंत त्याने नाग, मण्यार, फुरसे, घोणस, वेनुनाग, पोवळा, हरणटोळ, उडता सोनसर्प, भारतीय अंडीखाऊ साप, मांजऱ्या, रेतीसर्प, अजगर, खापरखवल्या, मांडोळ, कवड्या, कुकरी, गवत्या, पानदिवड, विरोळा, सोंगट्या, धामण, तस्कर, नानेटी, पंढरा, फोडसा अशा विविध प्रकारच्या हजारो सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. काही ठिकाणी नाममात्र मानधन घेऊन तर काही ठिकाणी अगदी विनामूल्य देवेन सर्पमित्र म्हणून काम करीत असतो. त्याला या कामात काही ठिकाणी वन विभागाची मदतही होत असते. गेली अनेक वर्षे त्याने जोपासलेल्या या छंदामुळे आज हजारो सापांसाठी तो देवदूत ठरत आहे. किंबहुना, या छंदातून तो सापांविषयीचे गैरसमज दूर करीत असल्याने समाज जागृती होऊन लोकांचा सापांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे. यामुळे त्याचे कार्य हे नक्कीच प्रेरणादायी व कौतुकास पात्र आहे.

@@AUTHORINFO_V1@@