समाजकार्यातील राजसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


 


तरुण पिढीला व्यसनातून आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रातून मुक्त करण्याचे बहुमूल्य कार्य करणार्‍या अनिल राजभोज या समाजसेवकाविषयी जाणून घेऊया...

 

समाजात नि:स्वार्थ भावनेने काम करणार्‍यांना कोणीही रोखू शकत नाही. कारण, फक्त ‘समाजकारण’ हेच आयुष्याचे लक्ष्य असणार्‍या व्यक्ती आपले काम करतच असतात. मुंबईतील भांडुपचे समाजसेवक अनिल राजभोज हे त्यापैकीच एक नि:स्वार्थी समाजसेवक.

लहानपणापासून अनिल यांना घरातूनच समाजकारणाचे बाळकडू मिळत गेले. भांडुपमधील कोकणनगरमध्ये राहणारे अनिल यांचे बालपण अगदी सामान्य कुटुंबात गेले. त्यांचे वडील रस्त्यावर कपडे विकण्याचा व्यवसाय करायचे, तर आई दुधाचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावायची. अनिल यांना दोन भावंडे. या तिन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई-वडिलांनी अगदी व्यवस्थित पार पाडली. याबरोबरच शक्य होईल तसे समाजातील गरजू, अडल्या-नडल्यांना ते मदतही करत. हेच संस्कार अनिल यांच्यावर होत गेले आणि त्यांनी समाजकारणालाच आपले ध्येय बनविले.

 

बारावीनंतर अनिल यांनी ‘मॅकेनिकल’ विषयात पदविका पूर्ण करून गॅरेज सुरू केले. यामुळे घरी आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली. अनिल भांडुपमधील चाळीत राहत असल्याने त्यांना येथील समस्या, अडचणींची जवळून ओळख होती. परिसरातील मंडळात सहभागी होऊन लहान मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम त्यांनी सुरू केले. या उपक्रमांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे त्यांनी आपल्या सहकार्‍यांसमोर दिवाळीत वनवासी पाड्यांवर कपडे आणि खाऊ देण्याचा विचार मांडला. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कपडे, शैक्षणिक वस्तू दिल्या. या सर्व वस्तू आणि कपडे शहापूर येथील वनवासींना नित्यनेमाने दान करणे सुरू केले. याला जवळ-जवळ दहा वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही त्यांचे हे सामाजिक कार्य आजवर अखंडपणे सुरू आहे.

 

भांडुप हे तसे मध्यमवर्गीय बहुसंख्येचे उपनगर. येथे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसे. शिवाय विविध क्षेत्रात करिअर कसे करायचे, याविषयी मार्गदर्शन देण्याचे अनिल यांनी ठरविले. यासाठी नामांकित शिक्षक आणि करिअरविषयक मार्गदर्शन शिबिरे त्यांनी आयोजित केली. सुरुवातीला या शिबिरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, अनिल यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यांनी घरोघरी जाऊन मुलांना या शैक्षणिक शिबिरात सहभागी होण्यासाठी त्यांच्या पालकांना याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या धडपडीला यश येऊन पालकांनी आपल्या मुलांना या शिबिरात पाठविण्यास सुरुवात केली. या शिबिरांची विद्यार्थ्यांना खूप मदत झाली. आपले भविष्य घडविण्याची योग्य दिशा मिळाली.

 

अशा प्रकारची अनेक करिअर मार्गदर्शन शिबिरे ते आझही आयोजित करतात. याचप्रमाणे भांडुपमध्ये अनेक तरुण बेरोजगार असल्याने रोजगार प्राप्तीसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. या तरुणांना रोजगार मिळून त्यांचे आयुष्य मार्गाला लावले. अनिल यांनी अनेक नामांकित कंपन्यांमध्ये स्वत: भेट देऊन रोजगार मेळावे भरविण्यास सुरुवात केली. या रोजगार मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण तरुण-तरुणींना रोजगार मिळवून दिले.

 

भांडुपमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावे भरविले जातात. या मेळाव्यांचा येथील तरुणांना खूप फायदा झाला असून अनेकांना रोजगार मिळाले आहेत. भांडुपमधील अनेक किशोरवयीन मुलांनी चरस, गांजा आणि अमली पदार्थ सेवन करण्याच्या व्यसनांमध्ये वाढ झाली होती. मैदानात किंवा अडगळीच्या जागी या नशेच्या विळख्यात अडकलेली मुले दिसायला लागली. यामुळे या किशोरवयीन मुलांचे अनमोल जीवन या अमली पदार्थांमुळे धोक्यात येऊ नये, म्हणून अनिल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या अड्ड्यांवर लक्ष केंद्रीत केले. या अड्ड्यांवर येणार्‍या मुलांशी संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समज देण्यास सुरुवात केली. यात अनेकवेळा अनिल यांच्यावर हल्लेही झाले. मात्र, त्यांनी आपल्या या कार्यातून माघार घेतली नाही. या नशेबाज मुलांना समुपदेशकांकडे नेऊन त्यांना या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम आजही ते अविरतपणे करीत आहेत.

 

त्याचबरोबर अनेक नागरी समस्यांविषयी अनिल यांनी आवाज उठवला. अनिल राजभोज यांना त्यांच्या या समाजकार्यात पत्नीचीसुद्धा मोलाची साथ लाभली आहे. त्याही त्यांच्यासोबत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवितात. अनिल यांचे संपूर्ण कुटुंबच समाजसेवेत कार्यरत असल्याने त्यांच्या या कार्याचे भांडुपमध्ये नेहमीच तोंडभरुन कौतुक केले जाते. याविषयी अनिल म्हणतात की, "मला समाजात विशेषत: तरुणांसाठी काम करायचे आहे. कारण, तेच आपले भवितव्य आहेत. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी काम करीत असतो. यापुढेही मी आणि माझी पत्नी असेच काम करीत राहू."

 

अनिल राजभोज यांच्या या समाजकार्यामुळे अनेक तरुणांना योग्य दिशा मिळाली आहे. अनेकांची व्यसनाच्या नशाचक्रातून मुक्ती होऊन त्यांना रोजगार मिळाले आहेत. अनेकांचे संसार वाचले आहेत. त्यामुळे अनिल राजभोज यांचे समाजकार्य असेच अविरतपणे सुरु राहो आणि भांडुपमधील अनेकांना त्यांचे मार्गदर्शन लाभो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!

 
 
 
 -  कविता भोसले  
@@AUTHORINFO_V1@@