अत्त दीपं भव। स्वच्छतेसाठी सिद्ध होऊया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019   
Total Views |



स्वच्छ राहणे आणि स्वच्छता करणे ही सगळ्यांचच नैतिक जबाबदारी. त्यासाठी काम करणे म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आनंद जगताप यांचे आजवरचे स्वच्छतेचे कार्य...


"बाबासाहेबांनी समाजाला स्वच्छतेचे महत्त्व सांगितले होते. गरिबी असली, कपडे फाटके असले तरी स्वच्छता पाळा. चार कथिलाचे दागिने कमी घाला, पण मुलाबाळांना शिकवा. हा संदेश त्यांनी समाजाला दिला. त्या संदेशाचा खोल परिणाम माझ्या आईवडिलांवर होता. तेच संस्कार माझ्यावरही आहेत," मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण खात्याचे विशेष कार्याधिकारी आनंद जगताप सांगत होते. छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि 'मृत्युंजय' कादंबरीतील कर्णाचा आनंद यांच्या जीवनावर प्रभाव आहे. साताऱ्याच्या नेर पुसेगावचे 'आर्मीमॅन' ज्ञानू जगताप आणि त्यांच्या पत्नी सुलाबाई यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक आनंद. कडक शिस्तीच्या आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेल्या ज्ञानू यांनी आपल्या मुलांवरही अत्यंत चांगल्या शिस्तीचे आणि स्वच्छतेचे संस्कार केले. वस्तीतील लोक म्हणायचे, "ही सगळी बामणांची थेरं. आपण का करायची?" पण, ज्ञानू आपल्या मुलांना सांगायचे की, "स्वच्छता आणि शिस्त हीच आपल्या आयुष्याची संपत्ती." मुंबईतल्या वस्त्यांमध्ये स्वच्छतेचे व्यवस्थापन करण्यामध्ये आनंद यांचे महत्त्वाचे योगदान. या क्षेत्रातील ते भीष्माचार्यच! साधारणत: आनंद यांच्या मते, महात्मा गांधी म्हणाले होते की, 'एव्हरीबडी शुड बी स्कॅवेन्जर.' त्यांचे हे म्हणणे सध्याच्या परिस्थितीमध्येही अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, आपण केलेली घाण दुसऱ्याने साफ करण्याऐवजी आपली घाण आपणच साफ करायला हवी, यातच नैतिकता आहे. त्यामुळे घनकचरा आणि मलनिस्सारण विषयात काम करताना आनंद जगताप यांनी सदैव सामाजिक सहभागीतेचा अवलंब केला.

 

मुंबईत महाविद्यालयात शिकत असताना आनंद यांनी विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांबरोबर मालवणी, जोगेश्वरी येथील झोपडपट्ट्यांतील लोकांचे जीवन अगदी जवळून अनुभवले. तेव्हा चांगल्या घरच्या आनंद यांना वाटले की, ग्रामीण भागात त्यातही गावकुसाबाहेरच्या वस्तीमधील गरिबी वेदनादायी आहे, पण मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधील लोकांची गरिबी तर त्याहीपेक्षा भयाण! 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' या संस्थेमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर कोकणमध्ये खारजमिनीच्या प्रश्नावर, 'महिला आर्थिक विकास महामंडळा'मध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. 'माविम'मध्ये काम करत असताना त्यांनी त्यावेळच्या 'माविम'चा पूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला. त्यानंतर मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागामध्ये 'वस्ती शौचालय' विषयावर विशेष कार्याधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. इथूनच त्यांच्या कार्याला विशेषता प्राप्त झाली. साधारण 90च्या दशकात मुंबईमध्ये राजकीय निधीमधून बांधलेल्या शौचालयांची अवस्था नरकापेक्षाही वाईट असायची. आनंद जगताप यांनी वस्तीपातळीवरील संस्थेच्या सहभागातून 'वस्तीपातळीवरील शौचालय' ही संकल्पना उभी केली. आनंद जगताप यांच्या पुढाकाराने, मार्गदर्शनाने मुंबईमध्ये वस्तीपातळीवरील ८५० संस्था (सीबीओ) वस्तीपातळीवरील शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत.

 

हे काम सोपे नव्हते. कारण, महानगरपालिकेतर्फे वस्तीपातळीवर बांधल्या गेलेल्या शौचालयासाठी जागतिक बँकेची एक अट होती. ती अशी की, ज्या वस्तीमध्ये शौचालय बांधले जाणार, त्या वस्तीमधील घरटी प्रत्येक व्यक्तीने १०० रुपये आणि कुटुंबाने कमाल ५०० रुपये नोंदणी शुल्क भरायचे. पण, 'राजकारणी नेते फुकट शौचालय बांधून देत असताना आम्ही पैसे का भरायचे,' असे लोक म्हणायचे. तसेच राजकारण्यांना वाटायचे की, कोणत्याही कारणाने का होईना, लोक महानगरपालिकेच्या योजनेतून शौचालय बांधू लागले. तिथे वीज-पाणी-स्वच्छता मिळू लागली तर लोक आमच्याकडे का येणार? त्यामुळे आनंद जगताप मुंबईच्या वस्तीमध्ये शौचालय बांधणीचा विषय घेऊन गेले की त्यांना पहिल्यांदा असा अनुभव यायचा की, ते शौचालयनिर्मितीसाठी त्यातील सहभागितेसाठी लोकांना महतप्रयासाने तयार करायचे. लोक शुल्कही भरायचे, पण त्याआधीच राजकारणी त्याच जागेवर शौचालय बांधायला सुरुवात करायचे. कारण काय तर त्यांचे मतदार तुटू नये. मात्र, आनंद कोणत्याही राजकीय दबावाला कधीही बळी पडले नाहीत. अनेक राजकारण्यांनी त्यांना आमिष दाखवले की, 'शौचालय बांधून आम्हाला द्या, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा.' पण, आनंद कधीही बधले नाहीत. सफाई, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन या विषयावर काम करताना त्यांनी नवनवीन कल्पना वास्तवात आणल्या. शौचालयांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविणे, शौचालयांच्या वास्तूंचा वापर सामाजिक उपक्रमांसाठी करणे, वस्तीपातळीवरील संस्थांना स्वच्छतेसंदर्भात अद्ययावत जागतिक वर्तुळ, सरकारी योजना याबाबत जागृती करणे, शौचालय चालवणाऱ्या संस्थांनी सफाईबरोबरच शौचालयाच्या बाजूला स्वच्छतेच्या वस्तूंची विक्री करणे, महिला शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची मशीन्स बसवणे, त्यासाठी २३५ सीबीओंना प्रशिक्षण आणि सहकार्य करणे, एक ना अनेक नवीन उपक्रम. त्यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल मुंबईतल्या हजारो वस्त्यांमधील लाखो लोकांनी घेतली. या वस्त्यांमध्ये आनंद जगताप महानगरपालिकेचे 'साहेब' आहेत. यापेक्षा आनंद जगताप आपल्या समाजाचा माणूस, आपल्या पातळीवर येऊन आपल्या स्वच्छतेसाठी काम करतो, याचे कोण अप्रूप सगळ्यांनाच. नुकतेच 'केशवसृष्टी' येथे 'माय ग्रीन सोसायटी'च्या सहकार्याने 'मुंबई सीबीओ कोअर कमिटी'तर्फे सीबीओंचे दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामध्येही आनंद जगताप यांचा लक्षणीय सहभाग होता. ते म्हणतात, " 'अत्त दीपं भव। याचा अर्थ असाही आहेच की, अस्वच्छतेच्या अंधारावर, भयाणतेवर स्वच्छतेचा दीप लावूया. वस्ती स्वच्छतेसाठी वस्तीपातळीवरील शौचालयांना प्रथम स्वच्छ ठेवूया, तेही लोकसहभागातून."

@@AUTHORINFO_V1@@