मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवार उभे असले तरी खरी लढत ही किसन कथोरे व प्रमोद हिंदुराव यांच्यात होणार, असे दिसून येत आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे किसन कथोरे हे २०१४ मध्ये ८५ हजार, ५४३ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटीराम पवार यांचा २६ हजार २३० मतांनी पराभव झाला होता. त्यामध्ये गोटीराम पवार यांना ५९ हजार, ३१३ मते, वामन म्हात्रे यांना ५३ हजार, ४९६, अपक्ष आशिष दामले यांना ९ हजार, ७०५, काँगेसचे राजेश घोलप यांना ३ हजार, ४०१ व नोटा ३ हजार, ३९३ असे ६३ टक्के मतदान झाले होते.
मात्र, सध्या येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र ठाणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सध्या शिवसेना-भाजपची ताकद वाढली आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारवर जनता समाधान व्यक्त करत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील हे चांगल्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यामुळे विधानसभेतही महायुतीचाच अधिक बोलबाला दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी जोरात प्रचाराला लागले आहेत. मुरबाड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचा मतदार संघात चांगल्या प्रकारे जनसंपर्क असून कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रचारात उतरवली आहे. महाआघाडीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांनीही मतदारसंघात आपला संपर्क वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
बेरोजगारीची समस्या
मुरबाड शहरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न सध्या फार सतावत आहे. मुरबाड एमआयडीसीमध्ये बहुतेक कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे.
जातीय समीकरण
मुरबाड मतदारसंघात कुणबी आणि आगरी या दोन समाजाची संख्या सर्वात जास्त आहे. तसेच कुणबी सेना, आगरी सेना या संघटनांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केल्याने कथोरे यांना फायदा होण्याची चिन्हे वर्तविण्यात येत आहेत. तसेच वनवासी समाजाच्या हितासाठी लढणारी आदिवासी संघर्ष समितीचाही युतीलाच पाठिंबा असल्याने कथोरे यांचे पारडे जड मानले जात आहे.
-शंकर करडे