नवी दिल्ली : विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या तिनही बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय हा बँकिंग क्षेत्रातला महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. यापूर्वी स्टेट बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या तीन बँकांचे विलिनीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसर्या क्रमांकाची बँक ठरणार आहे. अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक बँकांचे विलीनीकरणाचे करण्याचे धोरण जाहीर केले होते. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत बँकेच्या कोणत्याही कर्मचार्याला कमी केले जाणार नसल्याची ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती.