श्रीविष्णू प्रतिमा आणि चिन्हसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018   
Total Views |




 


चिह्नसंस्कृती ‘सिम्बोलिझम’ किंवा प्रतिकशास्त्र म्हणजेच ‘आयकॉनॉलॉजी’ याचा अभ्यास करताना एक वास्तव विशेष प्रकर्षाने जाणवले की, प्राचीन भारतीय समाजाने या चिह्नांचा आणि प्रतिकांचा वापर शिशु-किशोर-कुमार वयातील विद्यार्थी आणि स्त्री-पुरुष नागरिकांच्या शिक्षणासाठी फार चतुराईने केला होता. या विज्ञाननिष्ठ बुद्धिमान-चतुर बांधणीमध्ये मूर्तिशास्त्र, शरीरशास्त्र, मानसशास्त्र, शिल्पकला, चित्रकला, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र, काव्य, नाट्य, संगीत, नृत्य, क्रीडा, संख्याशास्त्र, गणित, भूमिती, त्रिमिती आणि विरंगुळ्याचे बैठे खेळ या सर्व माध्यमांचा विलक्षण चातुर्याने उपयोग करून घेतला गेला.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
आपल्या निसर्गाने समृद्ध असलेल्या या भूमीवर आणि प्रगत विज्ञानाची मांडणी करणाऱ्या इथल्या अभ्यासू प्रजेवर साधारण नवव्या-दहाव्या शतकापासून विदेशी आक्रमकांची आक्रमणे सुरू झाली. इथली समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि धर्मस्थळे उद्ध्वस्त करण्याचे काम याच आक्रमकांनी केले. या सगळ्या अत्याचारांनी या मूळ समाजात अस्वस्थता निर्माण झाली, कधी नव्हे ती स्थानिक प्रजेत संशय आणि तिरस्काराची बीजे रोवली गेली. पुढील हजार वर्षांमध्ये म्हणजे या एकविसाव्या शतकातसुद्धा याचे गंभीर परिणाम सुरूच राहिले.

 

प्रतिकशास्त्राचा, चिह्नसंस्कृतीचा अभ्यास हे या सातत्याने बदललेल्या सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासाचे उत्तम साधन आणि माध्यम आहे. प्राचीन भारतातील मूर्तिशास्त्र, मूर्तिकला या काही हजार वर्षांपासून खूप प्रगत झाल्या होत्या. त्याचा अनुभव आजही आपण घेऊ शकतो. डॉ. सिग्मंड फ्रॉइड या विख्यात मानसशास्त्रज्ञाचा सर्वोत्तम शिष्य डॉ. कार्ल गुस्ताव यंग या गुरू इतक्याच विख्यात मानसवैज्ञानिकाने फार सूक्ष्मपणे भारतीय देवतांच्या मूर्ती, प्रतिमा आणि भक्ती उपासना या संदर्भात फार सूक्ष्मपणे निरीक्षण आणि विश्लेषण नोंदवले आहे. त्यांच्या मते, मूर्ती, प्रतिमा यांचा मानवाच्या मन, मानसिकता, मनोव्यापार यावर फार सखोल दीर्घकालीन परिणाम होत असतो. याचा वेध प्राचीन भारतीय विद्वानांनी निदान तीन हजार वर्षांपूर्वीच निश्चितपणे घेतला आहे. फक्त भारतीयच नव्हे, तर जगातील सर्व संस्कृतीतील समाजाने विश्वाच्या निर्मात्याचा आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंचमहाभूतांचा नेहमीच आदर केला आहे. प्राचीन भारतीय समाजात विश्वाच्या निर्मात्याला आणि नियंत्रणकर्त्याला देवत्व देताना त्याच्या मानवसदृश प्रतिमाही निर्माण केल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या व्यष्टी वैशिष्ट्यांसह त्यांच्या आयुधांसह प्रतिके तयार झाली.

 

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राचीन भारतीय शिल्प-मूर्ती-चित्र यांचे खास महत्त्व असे की, या सगळ्या गोष्टी म्हणजे पाठ्यपुस्तके होती. समोरच्या प्रतिमेची पूजा आपण करत असतो हे खरेच. मात्र, ही त्या चित्राची पूजा नाही. त्या मूर्तीत दिसत असलेल्या मूल्यांची आणि गुणवत्तेची ही पूजा आहे. योग्य साक्षरतेने ही मूल्ये आणि गुणवत्ता उपासकाला आत्मसात करता येतात.
 

 

श्रीविष्णू संयुक्त प्रतिमा (चित्र क्रमांक १)

निर्मिती-स्थिती-लय या अव्याहत निसर्गचक्रातील स्थितीतत्वाचा स्वामी, विश्वाचा पालनकर्ता श्रीविष्णूच्या अनेक मूर्ती, शिल्प आणि प्रतिमांमधील मुद्रा उपलब्ध आहेत. तरीही साधारणपणे चित्र क्रमांक १ मधील संयुक्त प्रतिमा नेहमीच संदर्भासाठी स्वीकारली जाते. संयुक्त प्रतिमा (कॉम्पोझिट आयकॉन) म्हणजेच सन्निध असलेल्या सजीव, निर्जीव आणि हातात धारण केलेल्या आयुधे-साधनांसह मानवीरूपातील देवी-देवतेची यांची प्रतिमा.

 

प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्रानुसार या प्रतिमेतसुद्धा श्रीविष्णू यांनी चतुर्भुज शरीरमुद्रा धारण केली आहे. आराध्य देवतेच्या अशा चार हातांचा संकेत फार तर्कसंगत आणि परिपूर्ण आहे. या विश्वावरची देव-देवतेची सार्वभौम सत्ता आणि सर्वव्यापकता असण्याचे संकेत हे चार हात एकत्रितपणे देत असतात. वरच्या आणि पुढच्या हातांचे संकेत संदर्भ पुन्हा वेगळे आहेत. देवतेचे वरचे दोन हात हे तिच्या अथवा त्याच्या पारलौकिक अस्तित्वाचा आणि आणि क्षमतेचा संकेत देत असतात. देवतेचे पुढचे दोन हात भौतिक आणि प्राकृतिक जगातील त्यांच्या अस्तित्वाचे प्रतीक आहेत.

 

श्रीकृष्ण अवतारातील सुदर्शन चक्र  (चित्र क्रमांक २)

आधी उल्लेख केल्यानुसार या सर्व प्रतिमा आपल्या चतुर, बुद्धिमान आणि अभ्यासू पूर्वजांनी निर्माण केलेली, मानवी मन आणि शरीराचा परिचय करून देणारी परिपूर्ण पाठ्यपुस्तकेच आहेत. मानवी रूपातील देव-देवतांच्या प्रतिमा सगुण-साकार करताना त्याचे असे चिह्नसंकेत हे परिपूर्ण आणि विज्ञाननिष्ठ आहेत. मानवी शरीरशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिल्पकला आणि चित्रकला अशा शास्त्र आणि कलांचा हा अद्भूत मेळ आहे. पारंपरिक भारतीय गुरूकुल शिक्षण प्रणालीमध्ये, प्रतिमेतील या संकेत आणि प्रतिकांचा परिचय प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणक्रमात योग्य वेळ करून दिला जात होता. नवव्या- दहाव्या शतकापासून सुरू झालेल्या परकीय आक्रमणानंतर, कालपरत्वे ही गुरूकुल शिक्षण प्रणाली खंडित झाली आणि समृद्ध साहित्यसंपदा कालौघात नष्ट झाली.

 

श्रीविष्णूचे उजवे शरीर हे मन, बुद्धी, स्मरणशक्ती, सर्जनशील वृत्ती, निर्मितीक्षमता आणि नवनिर्मिती याचे नियंत्रण करते. डावे शरीर हे प्रेम, करूणा, वात्सल्य, दयाशीलता, अनुकंपा अशा सर्व सजीवांच्या निसर्गदत्त जाणीवा आणि भावनांचे नियंत्रण करते. श्रीविष्णूंच्या उजव्या वरच्या हातातील तर्जनीवर फिरणारे चक्र त्याचे आलौकिक आयुध आहे आणि ‘सुदर्शन’ चक्र’ (चित्र क्र.२) या संबोधनाने सुपरिचित आहे. १०८ आऱ्या असलेले हे सुदर्शन चक्र असूर आणि दानव यांच्याशी होणाऱ्या युद्धसमयी, आदी योद्धा महादेवानी श्रीविष्णूंना दिले होते. देवतेचे वरचे हात अलौकिक क्षमतेचे निर्देशक आहेत. त्याच संकेतानुसार लक्ष्याचा भेद करून पुन्हा परत येणारे हे अमोघ अस्त्र श्रीविष्णू यांनी श्रीकृष्ण अवतारात धारण केले होते.

 

पुढच्या उजव्या हातात त्यांनी ‘गदा’ हे आयुध धारण केले आहे, याला ‘कौमोदकी’ असे संबोधन आहे. दोन बलिष्ठ योद्ध्यांमधील द्वंदयुद्धासाठी वापरले जाणारे हे आयुध लौकिक अर्थाने देवतेचे भौतिक जगातील अस्तित्व दर्शवते. देवतेच्या वरच्या आणि पुढच्या हाताच्या संकेतांचा हा फरक आपण समजून घ्यायला हवा. वरच्या उजव्या हातातील सुदर्शन चक्र हे देवतेची वैश्विक शक्ती आहे, ती सामान्य सजीवाला प्राप्त होत नाही. मात्र, पुढच्या हातातील गदा ही सामान्य सजीवालासुद्धा वापरता येते. सुदर्शन चक्र आणि पुढच्या उजव्या हातातील ही कौमोदकी गदा हे दोन्ही, देवतेच्या उजव्या शरीराच्या नियंत्रणाखालील मन-बुद्धी-स्मरणशक्ती याचा संकेत संदर्भ आहेत.

 

श्रीकृष्ण अवतारातील युद्धसमयीचा शंखनाद  (चित्र क्रमांक ३)

डाव्या हातातील प्रेम, करूणा, वात्सल्य, दयाशीलता, अनुकंपा अशा भावनाचे नियंत्रण करणाऱ्या देवतेच्या पुढच्या डाव्या हातात, आनंद आणि प्रगतीचे प्रतीक ‘पद्म’ म्हणजे कमळाचे फूल आहे. श्रीविष्णूच्या वरच्या डाव्या हातातील शंख (चित्र क्र.३) हे निसर्गात उपलब्ध होणारे सागरी जीवांचे कवच आहे. त्याच्या एका नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे ते श्वास फुंकून वाजविण्यासारखे एक वाद्य म्हणूनही आपल्या परिचयाचे आहे, त्यातून श्वास फुंकल्यानंतर त्यातून निघणारा नाद फार दूरवर ऐकता येतो. प्राचीनकाळी असा शंखनाद युद्ध सुरु झाल्याचे आणि प्रतिस्पर्ध्याला आव्हान दिल्याचे संकेत देत असे. मात्र, श्रीविष्णूंच्या डाव्या हातातील या शंखाचा नाद, सर्वांशी प्रेमाने वागा, माणुसकी जपा असा संकेत त्याच्या उपासकांना देत असतो. मत्स्य, कूर्म, वराह, श्रीराम आणि श्रीकृष्ण अशा अवतारांमध्ये, भक्तांच्याप्रती असलेली वत्सल भावना हा याचा महत्त्वाचा संदर्भ. हा शंख ‘पांचजन्य’ या संबोधनाने आपल्याला परिचित आहे. (चित्र क्र १) रामायणात आणि महाभारतात याच्या संदर्भात सविस्तर उल्लेख उपलब्ध आहेत. शंखासूर या दानवाचा पराभव करून त्याचे वसतिस्थान असलेला हा पांचजन्य शंख श्रीविष्णूच्या डाव्या हातातील अलंकार बनला.

७४००१७३६३७

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@