नवी दिल्ली : यावर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत भारताला बरेच सुवर्ण पदक मिळवून दिले. याच खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे या सगळ्या खेळाडूंची भेट घेतली तसेच त्यांचे कौतुक केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आपले गुरु, आईवडील आणि आजपर्यंत या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ज्या व्यक्तींनी मदत केली अशा काही महत्वाच्या आपल्या आयुष्यातील लोकांना कधीही विसरू नका त्यांच्या सानिध्यात रहा असा सल्ला यावेळी नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना दिला. तुम्ही सगळ्यांनी देशाच्या गौरवला वाढविले आहे. अशीच कामगिरी पुढे देखील करत रहा असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
ज्या खेळाडूंनी पदक जिंकले नाही त्यांना नरेंद्र मोदी यांनी प्रेरित केले तसेच पुढच्या वेळी जिद्दीने मेहनत करा असा सल्ला दिला. खेळाच्या क्षेत्रात आपण जितकी मेहनत करू तितके यश आपल्याला मिळेल तसेच प्रतिभा, प्रशिक्षण, जिद्द आणि मेहनत हे चार सूत्र नेहमी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या पिढीला देखील तुम्ही मोलाचे मार्गदर्शन करा असा सल्ला त्यांनी यावेळी या खेळाडूंना दिला. यावेळी सगळ्या खेळाडूंनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत समूह छायाचित्र देखील काढले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी मानसिक, शारीरिक आरोग्यासोबत तुम्ही ‘योग’ याची जोड द्या असेही ते यावेळी म्हणाले. आपल्या खेळाडूंनी जिंकलेले प्रत्येक पदक देशातील नागरिकांना गर्व तसेच आनंदी करतो असेही ते यावेळी म्हणाले.