रिपाइं (गवई गट) कार्यकर्त्यांची मागणी
फैजपूर येथील प्रांताधिकार्यांना निवेदन
फैजपूर, ता.यावल :
रावेर तालुक्यातील मंगरुळ येथील ग्रामपंचायतीच्या गावठाणातील भूखंड हडप करण्यात आला असून, त्यावर बेकायदेशीरपणे आश्रमशाळा चालवली जात आहे. या प्रकारासंदर्भात रावेर गटविकास अधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. भूखंड हडप करणार्यांवर कडक कारवाई करावी. तसेच कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी रावेर गटविकास अधिकार्यांना चौकशी करून निलंबित करावे, अशी मागणी रिपाइं (गवई गट) तर्फे करण्यात आली असून, या विषयासंदर्भात फैजपूर प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
मंगरुळ येथील भूखंड हडप केल्याच्या प्रकरणासह रिपाइं (गवई गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थोरगव्हाण (ता.रावेर) येथील ३३ नागरिकांच्या घरकुलांच्या विषयाकडेही लक्ष वेधले. थोरगव्हाण येथील ३३ नागरिक गट क्रमांक ४८५ मधील सरकारी जागेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांचे अतिक्रमण अद्यापही कायम झालेले नाही. हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय असून शासनाने त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशीही मागणी निवेदनात केली आहे. तसेच मारुळ (ता.यावल) येथील स्वस्त धान्य दुकान नंबर ९३ च्या चालकाची चौकशी करण्याची मागणी आहे. हा दुकानदार लाभार्थ्यांना अपूर्ण धान्य देऊन उर्वरित धान्य काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप आहे. या दुकानदाराची चौकशी करावी, असे निवेदन नमूद केले आहे. या सर्व मागण्यांचा विचार झाला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, तालुकाध्यक्ष विवेज तायडे, अमोल बोरेकर, एकनाथ गाढे, लखन इंगळे आदींनी दिला आहे.