भाजपच्या इतिहासातील ही कदाचित पहिलीच घटना
जामनेर : भाजपा स्थापने पासून पक्षाने संघर्ष केला आहे. २०१४ ला लोकसभेत घवघवीत यश मिळविल्यानंतर देशात कमळ फुलायला लागले आहे. पण नगरपालिका निवडणूकमध्ये संपूर्ण जागा भाजपाने जिंकल्या असल्याचे कुठेही निदर्शनास आलेले नाही. आज जामनेर नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि इतिहास घडला. लोकनियुक्त नगराध्यक्षसह सर्व जागा भाजपाने जिंकल्या. येथे नावापुरते सुद्धा विरोधक शिल्लक राहिले नाहीत हे विशेष.
जामनेर नगरपालिकेची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि २४ नगरसेवकांच्या जागेसाठी निवडणूक झाली. भाजपाने गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढत यश संपादित केले. भाजपातर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार महाजन यांच्या पत्नी साधना महाजन होत्या. महाजनांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. अर्थात भाजप विरोधी एकत्र आले होते. दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या आरोप प्रत्यारोप झाले. परंतु जनतेने भाजपावर दृढ विश्वास दाखवला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडता आले नाही.
असे घवघवीत यश भाजपाला महाराष्ट्र राज्यात प्रथमच नगरपालिका निवडणूकमध्ये मिळाले आहे. देशात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मध्ये भाजपाला असे शतप्रतिशत यश या आधी मिळाले असल्याचे एकिवात नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १०० टक्के भाजपाची मुहूर्तमेढ जामनेर पासून केली असे म्हणण्यास वाव आहे.