नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ लेण्यांचा यादित समावेश आहे.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. देशातील महत्वाच्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातील महत्वाच्या १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे.
या यादीत उत्तर प्रदेशातील ताजमहल आणि फत्तेपूर सिक्री, महाराष्ट्रातील अंजिठा व वेरूळ लेण्या, दिल्लीतील हुमायूँ मकबरा, कुतुबमिनार आणि लाल किल्ला, गोव्यातील कोळवा समुद्र किनारा, राजस्थानातील आमेर किल्ला, गुजरात मधील सोमनाथ मंदिर आणि धोलाविरा, मध्यप्रदेशातील खजुराहो, कर्नाटकातील हंपी, तामीळनाडूतील महाबलीपूरम, आसाम मधील काझीरंगा अभायारण्य, केरळ मधील कुमारकोम आणि बिहार मधील महाबोधी विहाराचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अल्फॉन्स यांनी दिली.