लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवार, २० जुलै रोजी जोरदार राडा झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले.
यावेळी त्यांनी कृषीमंत्र्यांना घरी बसून पत्ते खेळायला सांगा. माणिकराव कोकाटे यांना पदावर ठेवू नका. त्यांच्यामुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, असे म्हणत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनिल तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकले. या घनटेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली.
या मारहाणीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. या घटनेचा सगळीकडे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.