7/11 Mumbai Local Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडले? काय आहे कारण?

    21-Jul-2025   
Total Views |

मुंबई : (7/11 Mumbai Local Blasts) मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रद्द करत निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मात्र हा निकाल रद्द करून त्या सर्व आरोपींना तातडीने कारागृहातून सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. पुराव्याअभावी तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य न आढळल्याचे उच्च न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित असल्याने निकालाची प्रत हाती येताच या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत विचार करू, असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ व आरोपींकडून मिळालेले साहित्य आणि कबुलीजबाब या तीन आधारांवर हा खटला चालवण्यात आला होता. मात्र, या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा पोलिसांना सिद्ध करता आला नाही, असे नमूद करून न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका केली.

उच्च न्यायालयाचे निरीक्षण काय?
 
पोलिसांच्या आरोपांना समर्थन करणाऱ्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. या साक्षीदारांची साक्ष नोंदवताना अनेक तांत्रिक चुका करण्यात आल्या किंवा घटनेनंतर अनेक वर्षांनी त्यांचे जबाब नोंदवण्यात आले किंवा त्यांना आरोपीची ओळख पटवण्यास सांगण्यात आले. चार वर्षांनंतर आरोपींची ओळख पटवण्यास झालेल्या विलंबाचे कारणही तपास यंत्रणेतर्फे देण्यात आलेले नाही. त्यामुळे, एवढ्या वर्षांनी साक्षीदारांनी आरोपींचे चेहरे लक्षात ठेवणे हे विश्वसनीय नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने निकाल देताना नोंदवले. या प्रकरणातील गेल्या १९ वर्षांपासून असलेल्या सगळ्या आरोपींची जामिनावर तातडीने सुटका करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

वास्तविक, सत्र न्यायालयाने या प्रकरणी १३ आरोपींना दोषी ठरवले होते.परंतु, एका आरोपीचा मृत्यू झाला. त्यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणी पाच महिने नियमित सुनावणी सुरू होती. दीर्घकाळ सुरु असलेल्या सुनावणीनंतर गेल्या ३१ जानेवारी रोजी विशेष खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी सोमवारी २१ जुलैला खंडपीठाने या प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला.


काय आहे प्रकरण?

११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. अवघ्या ११ मिनिटांत झालेल्या ७ साखळी स्फोटांत तब्बल १८९ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर ८२७ लोक जखमी झाले होते. या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने एकूण १३ आरोपींना अटक केली होती. तपास यंत्रणेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर २००६ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयाने ९ वर्षांनंतर २०१५ मध्ये याप्रकरणी निकाल दिला होता. न्यायालयाने यातील १२ पैकी ५ आरोपींना फाशी, तर अन्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसैन खान आणि आसिफ खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. इंडियन मुझाहिद्दीनशी संबंधित हे सर्व आरोपी पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर या राज्यातील विविध कारागृहात सध्या बंदिस्त आहेत. या सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या खटल्यातील अन्य १५ आरोपी अद्यापही फरार आहेत.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\