वलींची वळवळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018   
Total Views |



 
 
 
अभिविसंगतींवरील लेख प्रकाशित झाल्यानंतर काही वाचकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या, आम्हाला काहीच कळलं नाही! ‘रचनात्मक भूशास्त्र’ हा थोडासा किचकट व फारच सैद्धांतिक विषय आहे. काही गोष्टी यात आपल्याला मानून चालावे लागते तसेच सर्व गोष्टींची छायाचित्रे लेखात देताही येत नाहीत. त्यामुळे मी असा सल्ला देईन की, जर काही समजले नाही पण, समजून घ्यायची इच्छा असेल, तर इंटरनेटवर शोधा. यासाठीच मी प्रत्येक लेखात सर्व पारिभाषिक शब्दांची इंग्रजी प्रतिनामे दिलेली आहेत व यापुढेही देत राहीन.
 

आधीच्या लेखात आपण ‘रचनात्मक भूशास्त्रा’बद्दल माहिती घेतली. या लेखात आपण हेच प्रकरण सुरू ठेवून वलींचा अभ्यास करू. ‘वली’ (Fold) ही रचनात्मक भूशास्त्रातील एक महत्त्वाची रचना आहे. याची व्याख्या पृथ्वीच्या कवचातील विविध बलांमुळे खडकांमध्ये निर्माण झालेले वर्तुळाकार किंवा वळणदार आकार अशी करता येईल. ‘वली’ हे कोणत्याही प्रकारच्या खडकात तयार होतात. जेवढे बल जास्त, तेवढा खडक वळणदार असतो. आपण आता ही क्रिया कशी होते हे बघूया. वली तयार होण्याच्या प्रक्रियेला ‘वलीकरण’ (Folding) म्हणतात. ही प्रक्रिया फार हळू चालते. किंबहुना हजारो वर्षे चालू असते. ही क्रिया खडकांचे आसपासच्या बलांमुळे होणारे रूपांतरण दर्शवतेकोणत्याही रचनेला एक आकार असतो. तसेच प्रत्येक रचनेमध्ये काही लहानसहान भाग असतात. उदाहरणार्थ, आपल्या शरीरात हात, पाय, डोकं, इत्यादी. आता आपण कोणत्याही वलीमध्ये कोणते भाग असतात यांची माहिती घेऊ.

 

 
 

. लिम्ब (Limb) - याचा अर्थ वलीचे अंग असा होतो. हा भाग वलीच्या दोन्ही बाजूंना असतो. वलीच्या मधल्या टोकामधून दोन विरुद्ध बाजूंना लिम्ब निघतात व त्या वलीच्या शेवटच्या टोकापर्यंत जातात. 

. हिंज पॉईंट (Hinge point) - वलीमध्ये ज्या भागाचे वळण सर्वाधिक असते व ज्या बिंदूवर एक लिम्ब संपून दुसरी लिम्ब सुरू होते. त्या बिंदूला ‘हिंज पॉईंट’ असे म्हणतात. 

. अक्षीय प्रतल (Axial plane) - जे प्रतल एका वलीतील सर्व स्तरांच्या हिंज पॉईंटमधून जाते, त्याला ‘अक्षीय प्रतल’ असे म्हणतात.

. वली अक्ष (Axis) - अक्षाची व्याख्या ही अक्षीय प्रतल व कोणताही स्तर यांच्या छेदनबिंदूमधून गेलेल्या रेषेला ‘वलीचा अक्ष’ असे म्हणतात.

. प्लंज (Plunge) - वलीचा अक्ष व क्षितिज रेषा यांच्यामधील कोनाला ‘प्लंज’ म्हणतात.

. क्रेस्ट व ट्रफ (Crest and Trough) - कोणतेही वली प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे वरून कमानीसारखा असणारा (Up arched) व दुसरा म्हणजे खालून कमानीसारखा असणारा (Down Arched). ‘क्रेस्ट’ म्हणजे अपआर्च्ड वलीच्या सर्वात बाहेरील भागातून जाणारी रेषा व ‘ट्रफ’ म्हणजे डाऊनआर्च्ड वलीच्या सर्वात आतील भागातून जाणारी रेषा.

 

 
 

वर उल्लेखित केलेले भाग हे वलींचे फक्त काहीच भाग आहेत. सर्व भागांची माहिती देत बसलो, तर ते फारच लांबलचक प्रकरण होईल. या भागांवरूनच वलींचे विविध गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. हे कशा प्रकारे वर्गीकरण केले जाते, हे आपण थोडक्यात बघू. वर उल्लेखित केल्याप्रमाणे वलींचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात - वरून कमानीसारखा व खालून कमानीसारखा. यातील वरून कमानीसारख्या असलेल्या वलीला ‘अँटिक्लाईन’ (Anticline) असे म्हणतात. या वलीमध्ये दोन्ही लिम्बमधल्या फुगीर भागातून दोन्ही विरुद्ध दिशेने खाली जातात. याच्या बरोबर उलट म्हणजे खालून कमानीसारख्या असलेल्या वलीला ‘सिनक्लाईन’ (Syncline) असे म्हणतात. यात दोन्ही लिम्ब मधल्या खोलगट भागातून दोन्ही विरुद्ध दिशेने वर जातात.

 

वलींच्या इतर कोणत्याही प्रकारामध्ये वरील दोनपैकी एक प्रकार अंतर्भूत असतोच. इतर प्रकार हे काही मापदंडांवर ठरवले जातात. हे मापदंड व वलींचे प्रकार यांची माहिती घेऊ.

. अक्षीय प्रतलाचे स्थान (Position of Axial plane) - अक्षीय प्रतलाच्या स्थानावरून वलींचे अनेक प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे-

. सम वली (Symmetrical Fold) - यात अक्षीय प्रतल हे बरोबर उभे असते. याच्या दोन्ही लिम्ब्स या विरुद्ध दिशेला, सारख्या आकारात व सारख्या कोनात कललेल्या असतात.

. विषम वली (Asymmetrical Fold) -यात अक्षीय प्रतल हे क्षितिजाशी कोणत्याही कोनात असते, पण उभे नसते. त्यामुळे याच्या दोन्ही लिम्ब्स या असमान लांबीच्या तशाच वेगवेगळ्या कोनात कललेल्या असतात.

. अतिवलित वली (Overturned Fold) - हा एक खास प्रकारचा विषम वली आहे. जेव्हा एखाद्या वलीच्या दोन्ही लिम्ब्स या एकाच दिशेला वळलेल्या असतात, तेव्हा या वलीला ‘अतिवलित वली’ म्हणतात. याचे अक्षीय प्रतल हे उभे नसून क्षितिजाशी इतर कोणत्याही कोनात कललेले असते.

. आयसोक्लाईनल वली (Isoclinal Fold) - जेव्हा अनेक वली एका रांगेत एकमेकांपुढे असतात व त्या सर्वांची ‘अक्षीय प्रतले’ एकमेकांना समांतर असतात, तेव्हा या वलींना ‘आयसोक्लाईनल वली’ म्हणतात. हे वली अँटिक्लाईन-सिनक्लाईन असे आलटून पालटून असतात.

. पहुडलेला वली (Recumbent Fold) - काही अतिवलित वली हे इतके कललेले असतात की, त्यांचे ‘अक्षीय प्रतल’ हे जवळजवळ आडवे होते. याला ‘पहुडलेला वली’ असे म्हणतात.

. दाबाची तीव्रता (Degree of compression) - जेवढा दाब खडकांवर पडतो, तेवढे त्यांचे वळण जास्त असते. यावरून यांचे सौम्य वली (Gentle Fold), उघड वली (Open Fold), बंद वली (Close Fold) व घट्ट वली (Tight Fold) इत्यादी प्रकार पडतात.

. सापेक्ष वळण (Relative Curvature) - एखाद्या वलीच्या दोन निरनिराळ्या स्तरांच्या वळणांवरील फरक म्हणजे सापेक्ष वळण म्हणतात. या सापेक्ष वळणावरून वलीचे Class १, Class २, Class ३ असे तीन प्रकार पडतात. यात Class १ या वलीमध्ये एका स्तराचे वळण हे त्याच्या वरच्या स्तराच्या वळणापेक्षा जास्त असते. Class २ प्रकारच्या वलीमध्ये दोन्ही स्तरांचे वळण हे सारखेच असते, तर Class ३ वलीमध्ये एका स्तराचे वळण हे त्याच्या वरच्या स्तराच्या वळणापेक्षा कमी असते.

. वलीचा पृष्ठभाग (Profile of Fold Surface) - वलींच्या पृष्ठभागाच्या प्रकारांप्रमाणे वलींचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात -

. शेव्हरॉन वली (Chevron Fold) - यांचे लिम्ब्स हे एकदम सरळ असतात. यांना वळण नसते. क्रेस्टपासून ट्रफपर्यंत सरळच्या सरळ यांची लिम्ब असते. यांचे क्रेस्ट आणि ट्रफ एकदम टोकदार असतात.

. कस्पेट वली (Cuspate Fold) - यांचे क्रेस्ट व ट्रफ हे जरी टोकदार असले तरी, मधील लिम्ब ही वळणदार असते.

. कॉन्जुगेट वली (Conjugate Fold) - या प्रकारच्या वलींमध्ये अनेक प्रकारचे वलींचे प्रकार एकत्र आलेले असतात.

अजून काही वलींचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. ते प्रकार आपण पुढील लेखात पाहू. तसेच आपण वलीच्या रचनेमुळे तयार झालेल्या जगातील काही वलीय पर्वतांची माहितीही बघूया.

संदर्भ – Textbook of Engineering and general Geology- Parbin singh Katson Publishing House

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@