पुणे: काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर अध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता या पदासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शहा यांच्या नावाचा विचार करण्यात येत आहे.
अभिनेते नासिरुद्दीन शहा हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी १९७५ ते १९७८ या काळामध्ये एफटीआयआयमधून अभिनयाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. ते माजी विद्यार्थी असल्यामुळे तिथल्या वातावरणाशी परिचित आहेत. त्याचप्रमाणे त्यांची परखड भूमिका, विद्यार्थ्यांशी असलेले जवळचे नाते या गोष्टींमुळे ते या पदासाठी योग्य निवड ठरतील असे सांगितले जात आहे.
११ ऑक्टोबर २०१७ रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची निवड केली होती. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे संस्थेला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे खेर यांनी सांगितले होते. याआधी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनाही अध्यक्षपदासाठी विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी नकार दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/