जगातील काही समुद्र...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018   
Total Views |



मागील लेखात आपण सागराच्या उदरात डुबकी मारून सागराच्या अंतरंगाची माहिती घेतली. या लेखात आपण जगातील काही सागर व महासागरांची ओळख करून घेणार आहोत.


विध समुद्रांची माहिती घेण्याआधी काही महत्त्वाच्या संज्ञा बघू.

 

. समुद्र (Sea)

 

ज्या प्रचंड जलाशयात खाऱ्या पाण्याचे अस्तित्व आढळते, त्या जलाशयाला ‘समुद्र’ असे म्हणतात.

 

. महासागर (Ocean)

 

जे समुद्र हे प्रचंड आकाराचे असतात, त्या जलाशयाला ‘महासागर’ असे म्हणतात.

 

. उपसागर (Bay)

 

समुद्राचा जो भाग काही प्रमाणात जमिनीला जोडलेला असतो, त्याला ‘उपसागर’ म्हणतात. हा आखातापेक्षा मोठा असतो.

 

. आखात (Gulf)

 

जेव्हा कोणत्याही जलाशयाच्या तीन बाजूंना जमीन असते व एका बाजूला पाणी असते तेव्हा त्या रचनेला ‘आखात’ म्हणतात.

 

. सामुद्रधुनी (Strait)

 

जेव्हा कोणताही नैसर्गिक जलमार्ग जमिनीला चिरून दोन मोठ्या जलाशयांना (समुद्रांना) जोडतो, तेव्हा त्या रचनेला ‘सामुद्रधुनी’ म्हणतात.

 

. खाडी (Creek)

 

जेव्हा नदी समुद्राला मिळते, तेव्हा तिच्या मुखापासून नदीत आतमध्ये काही अंतर समुद्राचे खारट पाणी येते. या खारट पाण्याच्या जागेला ‘खाडी’ म्हणतात.

 

. द्वीपकल्प (Peninsula)

 

जेव्हा जमिनीच्या कोणत्याही तीन बाजूंना जलाशय व एका बाजूला जमीन अशी रचना असते, तेव्हा त्या रचनेला ‘द्वीपकल्प’ असे म्हणतात.

. बेट (Island)

 

जेव्हा जमिनीच्या सर्व बाजूंना जलाशय असतो तेव्हा त्या रचनेला ‘बेट’ असे म्हणतात.

 

 
 
 

सर्वांना माहीत आहेच की, पृथ्वीचा जवळजवळ ७१ टक्के पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. या पाण्याच्या आवरणाला ‘जलावरण’ (Hydrosphere) असे म्हणतात. या एकूण पाण्यापैकीसुद्धा अंदाजे ९६ टक्के पाणी हे फक्त समुद्रांमध्येच आहे. पृथ्वीवर अरबी समुद्र (Arabian Sea), मृत समुद्र (Dead Sea) असे समुद्र आहेत. तसेच अनेक लहान समुद्रही आहेत ज्यांना आपण ‘उपसागर’ म्हणतो. उदाहरणार्थ, बंगालचा उपसागर (Bay of Bengal). आपण काही समुद्रांची माहिती घेऊ.

 

. अरबी समुद्र (Arabian Sea) :

 

भारताचा पश्चिम किनाऱा हा या समुद्राला चिकटला आहे. या समुद्राच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला पाकिस्तान, पश्चिमेला एडनचे आखात आणि पूर्वेला भारत देश आहे. युरोप व आशिया खंडांना हा समुद्र जोडतो. साधारण ५० दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय उपखंड आशिया खंडाला येऊन चिकटले, तेव्हा याचा जन्म झाला. या सागराचे क्षेत्रफळ साधारण ३८ दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. या सागराची सरासरी खोली २ हजार ५०० मीटर आहे. याची अधिकतम खोली ही अंदाजे चार हजार ६५० मीटर आहे. या समुद्रात कार्ल्सबर्ग रिज (Carlsberg Ridge) नावाची मध्य सामुद्रिक पर्वतरांग आहे. या समुद्राला सिंधू, नर्मदा, तापी, साबरमती इत्यादी नद्या येऊन मिळतात. जलवाहतुकीसाठी या समुद्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तसेच मासेमारीसाठीही याचा उपयोग केला जातो. या समुद्राखालील जमिनीत काही ठिकाणी खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आढळलेले आहेत. यापासून जीवाश्म इंधने (Fossil Fuels - Petrol, Diesel, CNG, LPG) तयार केली जातात. उदाहरणार्थ, मुंबई हाय हे भारताच्या मालकीचे समुद्रातून खनिज तेल काढणारे केंद्र आहे.

 

. भूमध्य समुद्र (Mediterranean Sea) :

 

या समुद्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा समुद्र जवळजवळ सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. याच्या उत्तरेस युरोप खंडाचा दक्षिण भाग, दक्षिणेस आफ्रिका खंडाचा उत्तर भाग, पूर्वेला आशिया खंडाचा पश्चिम भाग, तर पश्चिमेला जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे. या सामुद्रधुनीतर्फे हा समुद्र अटलांटिक महासागराला मिळाला आहे. पण हा भाग तुलनेने बराच लहान असल्यामुळे या समुद्राचे वर्णन जवळजवळ नेहमीच एक वेगळा जलाशय म्हणून केले जाते. याचे क्षेत्रफळ हे जवळजवळ २५ लक्ष चौरस किलोमीटर आहे. याची सरासरी खोली साधारण दीड हजार मीटर आहे. मात्र, सर्वांत खोल भाग कॅलिस्पो गर्त (Calypso Deep) हा अंदाजे पाच हजार २६७ मीटर आहे. १९७० ते १९७५ या दरम्यान केलेल्या संशोधनांवरून असे समजते की, सहा दशलक्ष वर्षांपूर्वी हा समुद्र हे वाळवंट होते. कालांतराने जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमार्गे अटलांटिक महासागराचे पाणी यात येऊन हा समुद्र तयार झाला आहे. या समुद्राचा उपयोग जलवाहतुकीसाठी, मासेमारीसाठी होतो. तसेच दोन्ही महायुद्धांमध्ये या समुद्रावर अनेक लढाया झालेल्या आहेत.

 

 
 

. मृत समुद्र (Dead Sea)

 

हा समुद्र जॉर्डन व इस्रायल या देशांच्या सीमेवर आहे. याच्या पूर्वेला जॉर्डन, पश्चिमेला इस्राईल, तसेच उत्तरेला व दक्षिणेला इस्रायल-जॉर्डन सीमा आहे. हा समुद्र म्हणजे एक प्रचंड मोठा तलावच आहे. पण तो इतका मोठा आहे की, तलावाच्या व्याख्येत बसवता येत नाही. म्हणून याला समुद्र म्हणायचं. या समुद्राची क्षारता ही इतर कोणत्याही महासागरापेक्षा जवळजवळ १० पट जास्त आहे. या समुद्रात मिठाचे व क्षारांचे प्रमाण एवढे जास्त आहे की, कोणताही जलचर अथवा वनस्पती येथे तग धरू शकत नाही. म्हणून नावाप्रमाणेच आहे हा, पूर्णपणे मृत. याचे क्षेत्रफळ हे सुमारे ६०५ चौरस किलोमीटर आहे. याची सरासरी खोली ही फक्त ६५३ फूट आहे, तर अधिकतम खोली ही ९७८ फूट आहे. म्हणजेच समुद्र या व्याख्येच्या दृष्टीने फारच लहान व उथळ आहे.

 

. कॅरेबियन समुद्र (Caribbean Sea)

 

हा समुद्र कॅरेबियन बेटांजवळ आहे. हा जगातील सर्वांत मोठ्या समुद्रांपैकी एक आहे. या समुद्राचा बराचसा भाग एकाच सामुद्रिक ठोकळ्यावर आहे, ज्याचे नाव आहे कॅरेबियन प्लेट. याचे वय हे साधारण १६० ते १८० दशलक्ष वर्षे आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे २८ दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. याची सरासरी खोली सुमारे दोन हजार २०० मीटर आहे आणि केमॅन ट्रफ (Cayman Trough) येथे अधिकतम खोली सुमारे सात हजार ६८६ मीटर इतकी आहे. या समुद्राच्या उत्तरेला क्युबा, जमैका यासारखी बेटे, दक्षिणेला व्हेनेझुएलासारखे देश, पश्चिमेला कोस्टा रिका वगैरे देश, तर पूर्वेला बार्बाडोस, सेंट लुशिया इत्यादी बेटे आहेत. या समुद्राच्या किनाऱ्यावरील अनेक देशांमध्ये ज्वालामुखी आहेत आणि जवळजवळ सर्व देशांना कायम भूकंप व ज्वालामुखींच्या उद्रेकाचा धोका आहे. याचे कारण म्हणजे दक्षिण अमेरिकन प्लेट ही कॅरेबियन प्लेटवर दबाव टाकते. असे असूनसुद्धा स्थापत्य अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण या समुद्रात आहे आणि ते म्हणजे पनामा कालवा. हा कालवा कॅरेबियन समुद्र आणि प्रशांत महासागर यांना जोडतो. अजून अनेक समुद्र, उपसागर, अनेक भूरूपे यांच्या उदाहरणांची माहिती देता येईल. तथापि आपण येथेच थांबू. आज आपल्याला फक्त काही समुद्रांचीच माहिती बघता आली आहे. पुढील लेखात आपण जगातील पाच महासागरांची अशीच संक्षिप्त रुपात माहिती बघू.

 

संदर्भ - इंटरनेट

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@