केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा ना.डॉ. सुभाष भामरे यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद, धुळे तालुक्यातील गावांना भेटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018
Total Views |
 
केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा
 
ना.डॉ. सुभाष भामरे यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद, धुळे तालुक्यातील गावांना भेटी
धुळे, २१ ऑक्टोबर
धुळे जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. केंद्र सरकारकडून आवश्यक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल तसेच या परिस्थितीचा जिल्हास्तरावर प्रशासकीय यंत्रणेने आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहेत.
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी आज धुळे तालुक्यातील जुनवणे, शिरुड, बोरकुंड, विंचूर चौफुली, मुकटी, अंचाळे, चिंचखेडा आदी परिसरातील गावांना भेट देत तेथील पिकांची पाहणी केली तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी विकास अधिकारी विलास सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा. अरविंद जाधव आदी उपस्थित होते.
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे. कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. पाणीटंचाई निवारण्यासाठी आवश्यक तेथे विहिरींचे अधिग्रहण करून किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
तसेच जनावरांसाठी पाणी, चाराटंचाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांसह संबंधित यंत्रणेला दिले आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती पाहता अधिकारी व कर्मचार्‍यांनी संवेदनशील राहावे. कोणत्याही कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करू नये. पीकविम्याच्या रकमेबाबत संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात येतील, असेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी नमूद केले.
 
बोंडअळीचे अनुदान आठवडाअखेर शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे तहसीलदार मोरे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@