मुंबई : राज्यातील दिव्यांगानाही त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) ने मान्यता दिलेल्या कौशल्ययुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये यासाठी एक कक्ष या उपक्रमाची जबाबदारी हाताळणार आहे.
विशेष म्हणजे असे प्रशिक्षण देताना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) ने मान्यता दिलेल्या NSQF च्या स्तराशी सुसंगत असणारे विविध कौशल्ययुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (MSCVT) यांची मान्यता देण्यात येणार आहे.
दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याकरिता सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या विशेष शाळांना कौशल्य प्रशिक्षण संस्था म्हणून सूचिबध्द करण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवार हे या विशेष शाळांमध्ये अथवा नजिकच्या महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (MSCVT) यांचेकडे सूचिबध्द असलेल्या कौशल्य प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या मागणीनुसार कौशल्य प्रशिक्षण घेऊ शकणार असून यासाठी आवश्यक असल्यास त्यांच्या वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दिव्यांगांच्या २१ संवर्गातील दिव्यांग हे दिव्यांग नसलेल्या युवक-युवतींप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम असल्यास, त्यांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या मागणीनुसार कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधून कौशल्ययुक्त अभ्यासक्रमांच्या नियमित तुकड्यांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले आहे. दिव्यांग उमेदवारांना त्यांच्याकरिता लागू असलेल्या भाषांमध्ये शिकविण्याकरिता दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील शिक्षक वा कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तिंना कौशल्य प्रशिक्षण देण्यात असल्याचे पाटील यांनी कळवले आहे.