जलजीवन मिशनचे पैसे थकित? काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? हर्षल पाटील यांच्या मृत्यूनंतर मोठी प्रतिक्रिया
24-Jul-2025
Total Views | 47
मुंबई : शासकीय कामाचे पैसे थकल्याने सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आपले जीवन संपवले. यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलेही काम नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलेही काम नाही. जलजीवन मिशन योजनेवर कुठलेच बिल थकित नाही. एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतले असावे. पण जिल्हा परिषदेकडे त्याची नोंद नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आमच्या कार्यालयाने संपर्क केलेला आहे. मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललो आहे. त्यामुळे त्यांचा या गोष्टीत कुठलाही संबंध नाही, असे मला वाटते. त्यांनी सबलेट काम केले असेल तर ते आम्हाला माहिती नाही," असे ते म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
"सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडीत येथील हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काही ठिकाणी शासकीय कामे केली होती. त्याबदल्यात शासनाकडून १ कोटी ४० लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतू, कामाचे थकित पैसे मिळत नसल्याने त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.