आ. अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष ; मुंबई महापालिकेत भाजप नवीन रेकॉर्ड तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची नियूक्ती करण्यात आली आहे. सोमवार, २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत भाजप नवीन रेकॉर्ड तयार करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अन्य महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आमदार अमीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेला एक प्रदीर्घ काळ आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुका, लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका यामध्ये त्यांनी अतिशय उत्तम काम केले. मध्यतंरी ते मंत्री असताना मंगलप्रभात लोढा यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने मुंबई अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली. त्यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपला विधानसभेत चांगले यश मिळाले. भाजपने मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिष शेलार यांच्याकडे मंत्रीपदाचा कार्यभार आला आहे. त्यामुळे भाजपने आता मुंबईकरिता आपला नवीन अध्यक्ष निवडला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांशी आणि वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केली आहे."

मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार

"अमित साटम हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच भाजपमध्ये त्यांचा प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. त्यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विधानसभेत एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्यासाठी आवश्यक असलेली कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत आपली घोडदौड राखेल आणि मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास आहे. त्याकरिता ते सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडतील. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे यावेळी अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत एक नवा रेकॉर्ड तयार करेल," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

खोटेपणाचा किल्ला ढासळतो.

“राहुल गांधी हे सिरीयल लायर आहेत. ते वारंवार खोटे बोलतात. आता आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनासुद्धा अचानक राहुल गांधी खरे बोलत आहेत असे स्वप्न पडले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासोबत तेसुद्धा खोटे बोलत आहेत. परंतू, खोट्या गोष्टींना कोणताही पाया नसतो. त्यामुळे खोटेपणाचा किल्ला ढासळतो. जोपर्यंत त्यांना जनतेत जाऊन त्यांची मते आणि विश्वास जिंकावा लागतो हे कळत नाही तोपर्यंत ते स्वत: समजावत राहतील,” अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आ. अमित साटम यांची राजकीय कारकीर्द

आ. अमित साटम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत भाजपतर्फे देण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ पासून आतापर्यंत ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. सुमारे ४ लाख लोकसंख्या असलेल्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून ३ लाख मतदारांचे प्रतिनिधित्व ते करतात. तसेच त्यांनी पाच वर्षे महापालिकेचे नगरसेवक म्हणून कामकाज पाहिले आहे. परदेशातील नवे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी विविध देशांचे दौरेही केले आहेत. अध्यात्म, पर्यटन, शहरी नियोजन आणि विकास तसेच नेतृत्व विकास हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....