
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कपडय़ावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसोल कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी अधिक प्रमाणात झाली आहे. आग विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली अग्नीशमन दलासह अंबरनाथ अग्नीशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. अग्नीशमन दलाच्या एकूण 9 गाडय़ा आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते.
डोंबिवली एमआयडीसीत फेज एक मधील मानपाडा पोलिस ठाण्यामागील भागात एरोसोल कंपनी आहे. या कंपनीत कपडय़ावर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. बुधवारी दुपारी कंपनीत अचानक आग लागली. सुरूवातीला आगीचे स्वरूप सौम्य होते. पण कपडा असलेल्या भागात आग पसरल्याने काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती मिळताच कंपनीतील कर्मचारी आणि कामगार यांनी सुरक्षितपणे कंपनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुदैवाने कोणतेही जिवितहानी झाली नाही. केडीएमसीच्या अग्नीशमन विभागाला यासंदर्भातची माहिती मिळताच अग्नीशमन प्रमुख नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसी विभागात अनेक कंपनी असल्याने आग पसरू नये यासाठी अग्नीशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते. कल्याण अंबरनाथ मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी आणि इतर पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी यंत्रणांची गरज आहे का याची माहिती घेतली.
देवेन सोनी यांनी सांगितले, कंपनीत ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट झाला. शॉर्टसर्किट झाला. त्याची ठिणगी कापडय़ामध्ये उडल्याने आग पसरत गेली. आग लागल्याचे समजताच कर्मचारी सगळे बाहेर पडले. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. कपडा आतमध्ये गरम राहिल्यास पुन्हा दुर्घटना होऊ नये याकरिता दक्षता घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.