मुंबई, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र सहकारी संघ शिक्षण-प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संघाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वतः महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत स्थापन झालेल्या संघाचे नेतृत्व वसंतदादा पाटील यांच्यासहित राज्याच्या सहकारातील धुरिणांनी केले त्या राज्य सहकारी संघाची निवडणूक २०२५-२०३० करिता २७ जुलै रोजी पार पडणार आहे. ही निवडणूक मी स्वतः तसेच राज्य सहकारी मजूर संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल म्हणून सामोरे जात आहोत. निवडणुकीत एकूण २१ जागा असून त्यापैकी आमच्या पॅनेलच्या ९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा आशीर्वाद निश्चितपणे सहकार पॅनेलच्या मागे असल्याने ही यशस्वी घोडदौड करता आल्याचेही दरेकर म्हणाले.
इतर संस्था मतदार संघात ५ जागांसाठी निवडणूक होतेय. त्यामध्ये नंदकुमार काटकर, या पॅनेलचे नेतृत्व करणारे संजीव कुसाळकर, सुनील पाटील (सांगली), नितीन बनकर, सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष रामदासमोरे, अर्जुनराव बोबडे (ओबीसी,अहिल्यानगर), धनंजय शेडगे (कोल्हापूर), वसंत पाटील (नागपूर), प्रकाश भिशीकर (नागपूर), अशोक जगताप हे निवडणूक लढवत असून आमच्या पॅनेलची निशाणी कपबशी आहे. एकूण ९ मतदान केंद्रावर ही निवडणूक संपन्न होणार असल्याची माहितीही दरेकरांनी यावेळी दिली.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.