राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल; थेट आकडेवारी जाहीर करत सडेतोड उत्तर
07-Jun-2025
Total Views |
मुंबई : राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावर बावनकुळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदारांची वाढ संशयास्पद आहे. पण राहुलजी २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. एप्रिल २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते, तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले होते. तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की, तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का?" असा सवाल त्यांनी केला.
जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही!
ते पुढे म्हणाले की, "२००४, २००९ ला जिंकलात तेव्हा तुम्हाला काही प्रश्न पडले नाहीत. आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला झिडकारले तेव्हा रडगाणे सुरू झाले. राहुलजी आकड्यांचे अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला नाकारले आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचे कारण देत आहात. आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहुल गांधींना म्हणाले.