भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी दि. २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल होत नवा इतिहास रचला आहे. राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. यानंतर 'अंतराळवीर' म्हणजेच 'अॅस्ट्रोनॉट' हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरंतर 'अंतराळवीर' किंवा 'अॅस्ट्रोनॉट' हा शब्द सगळ्याच देशांमध्ये वापरला जात नाही. विविध देशांत अंतराळ यात्रींसाठी वेगवेगळे शब्द किंवा नावं वापरली जातात. जसं की कॅास्मोनॉट, तायकोनॉट आणखी बरीच. या नावांमध्ये काय फरक आहे? ही नावं कोण ठरवतं? भारतीय अंतराळ प्रवाशांना व्योमनॉट्स का म्हणतात? आणि त्याचा अर्थ काय? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या लेखातून...
खरंतर अंतराळ प्रवाशांना त्यांच्या राष्ट्रीय उत्पत्ती किंवा भाषेनुसार नावे देण्याची परंपरा आहे. या परंपरेचे मूळ मानवी अंतराळ संशोधन कार्यक्रमांच्या ऐतिहासिक विकासात आहे. ज्या देशांकडे स्वतःचे अंतराळ कार्यक्रम आहेत, ते आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब असणारी विशिष्ट संज्ञा वापरून आपल्या अंतराळ प्रवाशांना संबोधित करतात.
अमेरिकेने १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा अंतर्गत मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम सुरू केला. त्यावेळी 'अॅस्ट्रोनॉट' या शब्दाची प्रेरणा ग्रीक भाषेतून घेण्यात आली. ग्रीक भाषेत, 'अॅस्ट्रोन' म्हणजे तारा आणि 'नॉट' म्हणजे खलाशी. नासाचे तत्कालीन प्रशासक टी कीथ ग्लेनन आणि त्यांचे उपप्रशासक ह्यू ड्रायडेन यांनी अंतराळयानातील क्रू मेंबर्संना अॅस्ट्रोनॉट म्हणावे की कॉस्मोनॉट यावर चर्चा केली. ड्रायडेन यांनी कॉस्मोनॉट शब्दाली पसंती दर्शवली. त्यांच्या म्हणण्यानुसार अवकाश उड्डाणं ही व्यापक स्वरुपाची असतील. त्यात ॲस्ट्रो हा शब्द फक्त ताऱ्यांपुरता मर्यादित आहे. परंतु बहुतांश नासा स्पेस टास्क ग्रुप मेंबर्संनी ॲस्ट्रोनॉट शब्दाला पसंती दिली. आणि तेव्हापासून तोच शब्द पुढे वापरासाठी प्रचलित झाला.
'स्पेशियनॉट' हा शब्द प्रामुख्याने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मोहिमेत सहभागी होणाऱ्या तसेच फ्रेंच अंतराळ प्रवाश्यासाठी वापरले जाते. स्पेशियनॉट हा शब्द स्पेशियम या लॅटिन शब्दपासून आला आहे ज्याचा अर्थ अवकाश असा आहे. 'कॉस्मोनॉट' म्हणजे रशियन किंवा पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील अंतराळयात्री. रशियन भाषेत "कॉसमॉस" शब्दाचा अर्थ अवकाश किंवा अंतराळ असा होतो आणि नॉट म्हणजे खलाशी, म्हणून कॉस्मोनॉट म्हणतात.
चीनने १५ ऑक्टोबर २००३ रोजी आपल्या पहिल्या क्रू मिशन, शेन्झोउ-५ च्या प्रक्षेपणासह मानवी अंतराळ कार्यक्रमात प्रवेश केला. या मोहिमेत यांग लिवेई या चिनी तायकोनॉटला अंतराळात नेण्यात आले, ज्यामुळे तो अंतराळात प्रवास करणारा पहिला चिनी व्यक्ती बनला. मानदारिन चिनी भाषेत, "तायकोंग" शब्दाचा अर्थ अवकाश असा होतो आणि ग्रीक भाषेत "नॉट" म्हणजे खलाशी. हा शब्द सामान्यतः पश्चिमेकडे चिनी अंतराळ प्रवाशाला सूचित करण्यासाठी वापरला जातो. तथापि, देशातील अंतराळ प्रवाशांचे अधिकृत चिनी नाव "वुहांगयुआन" आहे, ज्याचा अर्थ "विश्वाचे प्रवासी" असा होतो.
व्योमनॉट हा भारतातील अंतराळवीर किंवा अवकाशयात्री साठी वापरला जाणारा शब्द आहे. 'अंतराळवीर' किंवा 'स्पेसमन' या शब्दांप्रमाणेच, 'व्योमनॉट' हा शब्द देखील अंतराळात प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो, पण तो फक्त भारतीय अंतराळवीरांसाठी वापरला जातो. व्योमनॉट हा शब्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोद्वारे तयार करण्यात आला आहे. याचा अर्थ भारतीय अंतराळवीर किंवा अवकाशयात्री असा होतो. या शब्दाची फोड केल्यास व्योम आणि नॉट हे दोन स्वतंत्र शब्द मिळतात. त्यातील व्योम हा शब्द संस्कृत भाषेतील असून त्याचा अर्थ आहे 'अवकाश' तर दुसरा शब्द नॉट हा इतर देशांप्रमाणेच आपणही ग्रीक भाषेतून घेतला आहे ज्याचा अर्थ आहे प्रवासी किंवा खलाशी. भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहिम गगनयानमध्ये सहभागी होणाऱ्या अवकाश यात्रींना व्योमनॉट म्हटले जाईल. अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम विकसित करणारा भारत हा चौथा देश आहे.
अंतराळ प्रवाशांना त्यांच्या राष्ट्रीय भाषेवर आधारित नावे देण्याची ही परंपरा, अमेरिका आणि यूएसएसआर यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात झालेल्या अंतराळ शर्यतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये रुजलेली आहे. मानवी अंतराळ संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, प्रत्येक देशाने आपला स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम सुरू केला आणि त्या अनुषंगाने आपल्या अंतराळवीरांसाठी विशिष्ट संज्ञा निवडली. यातून त्या देशाची राष्ट्रीय ओळख, सांस्कृतिक अभिमान आणि राजकीय भूमिका स्पष्टपणे दिसून येते.