चीनच्या भूमीत पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांवर राजनाथ सिंह यांचे टीकास्त्र! म्हणाले, "अशा दुटप्पी..."

    26-Jun-2025   
Total Views | 13

नवी दिल्ली : (Rajnath Singh slams Pakistan at SCO Summit)
चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी (SCO) भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफही चीनमध्ये आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री समोरासमोर आले. शांघाय परिषदेत संरक्षणमंत्र्यांची बैठक सुरु झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारत खडे बोल सुनावले.

बैठकीत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ख्वाजा आसिफ यांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले की, “काही देश दहशतवादाचा वापर सरकारी धोरण म्हणून करत आहेत आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. एससीओने अशा दुटप्पी मानकांचा अवलंब करणाऱ्या देशांवर टीका करण्यास मागेपुढे पाहू नये”, असे म्हणत त्यांनी चीनवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
 
राजनाथ सिंह यांनी एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सर्व सदस्य देशांना एकत्र काम करावे लागेल. दहशतवाद हा गुन्हा आहे आणि तो कुठेही, कोणीही आणि कोणत्याही उद्देशाने केला तरी तो अक्षम्यच आहे. आपल्याला दहशतवाद्यांना तसेच त्यांच्या प्रायोजकांना निधी देणाऱ्यांना आणि संघटकांनाही न्यायाच्या कचाट्यात आणावे लागेल. आजच्या काळातील सर्वात मोठी आव्हाने म्हणजे कट्टरतावाद, दहशतवाद आणि विश्वासाचा अभाव हे आहेत."

"कोणताही देश, कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी, एकटा कारवाई करू शकत नाही. यामुळे जागतिक व्यवस्थेत एकमेकांचा विश्वास आणि सहकार्य यावर भर दिला पाहिजे. ‘सर्वे जन सुखिनो भवन्तु’ ही भारताची जुनी म्हण आहे. त्यानुसार शांतता आणि समृद्धी याला भारत महत्व देतो. शांतता आणि समृद्धी दहशतवादासोबत नांदू शकत नाही. आपल्याला कठोर आणि सामूहिक कारवाई करावी लागेल.” असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

बैठकीदरम्यान राजनाथ सिंह यांचे चीनचे संरक्षण मंत्री ऍडमिरल डोंग जून यांनी स्वागत केले. त्यांनी एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत एक ग्रुप फोटोदेखील काढला, ज्यामध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ देखील होते. एससीओमध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, इराण, बेलारूस, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तान सारखे देश समाविष्ट आहेत.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121