स्वतंत्र हेलिकॉप्टर संचालनालय स्थापन करणार - नागरी उड्डाण मंत्री राममोहन यांची पुण्यात घोषणा
25-Jun-2025
Total Views |
पुणे : देशात हवाई प्रवासी सुविधेसाठी स्वतंत्र हेलिकॉप्टर संचालनालय स्थापन करणार असल्याची घोषणा आज येथे नागरी उड्डाण खात्याचे केंद्रीय मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी केली. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकार, पवन हंस आणि फिक्की (FICCI) यांच्या सहकार्याने ७वी हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट परिषदचे पुण्यात आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेला नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले होते.
या परिषदेत २० राज्य सरकारांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, IFSCA (गिफ्ट सिटी), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) तसेच नागरी उड्डाण मंत्रालय, DGCA, AAI आणि पवन हंस लिमिटेड येथील वरिष्ठ अधिकारी सहभागी सहभागी झाले. नायडू यांनी सांगितले की, भविष्यातील उड्डाण व्यवस्थेत हेलिकॉप्टर आणि लघुविमानांचे महत्त्व अधिक वाढणार आहे,“माझा विश्वास आहे की, पुढील दशकात उड्डाण सेवा केवळ मोठ्या विमानांनी आणि भव्य विमानतळांनी नव्हे तर समावेशी आणि आधुनिक हवाई उपाययोजनांनी निश्चित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट ही ‘उड्डाणाचा लोकशाहीकरण’ करण्याच्या आमच्या मिशनचे केंद्रबिंदू आहेत.”
ते म्हणाले की, DGCA अंतर्गत स्वतंत्र हेलिकॉप्टर संचालनालय स्थापन केले जाईल आणि या संचालनालयामार्फत हेलिकॉप्टरविषयक सुरक्षितता, प्रमाणपत्र आणि प्रक्रियात्मक मदतीसाठी एकाच खिडकीतून सुविधा दिल्या जातील. त्यांनी ‘हेली सेवा’ पोर्टल सारख्या डिजिटल उपक्रमांची माहिती दिली, ज्यामुळे मार्ग मान्यता व स्लॉट वाटप या प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम झाल्या आहेत. यावेळी उडाण योजनेंतर्गत हेलिकॉप्टर मार्गांचे वाटपही विविध राज्यांमध्ये करण्यात आले.
संचालक व ऑपरेटरांशी संवाद साधताना, त्यांनी सांगितले की,“तीर्थयात्रेतील प्रवाशांचे सुरक्षेचे सर्वात जास्त प्राधान्य असावे. कोणतेही शॉर्टकट, संवादातील त्रुटी किंवा चुकीचे निर्णय याला क्षमा नाही. विश्वास, संवाद व शिस्त यावर आधारित संस्कृती निर्माण करणे ही केंद्र, राज्ये आणि ऑपरेटर यांची सामायिक जबाबदारी आहे.”
‘विकसित भारत २०४७’ या दृष्टिकोनावर भर देत, नायडू यांनी स्पष्ट केले की हेलिकॉप्टर व लघुविमान हे प्रादेशिक हवाई संपर्क, आर्थिक परिवर्तन आणि सर्वसमावेशक विकासाचे बळकट आधारस्तंभ असतील. डीजीसीए चे महासंचालक फैज अहमद किडवाई यांनी सुरक्षिततेचे महत्त्व, नियमांचे पालन आणि नव्या संधींचा योग्य उपयोग यावर भर दिला. या परिषदेत डीजीसीए सुरक्षा नियम, IFSCA द्वारे वित्तपुरवठा आणि भाडे तत्वांवरील संधी, निर्माते व ऑपरेटरच्या अडचणी, राज्य सरकारांच्या आकांक्षा, उद्योगातील नव्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा, निर्मिती क्षमता आणि वित्तीय चौकटी यावर तांत्रिक सत्रांद्वारे सविस्तर चर्चा झाली. उडाण ५.१ अंतर्गत हेलिकॉप्टरसाठी नवीन योजना, पायलट प्रशिक्षण आणि विमाने प्रमाणित करण्यासाठी डीजीसीए ने सोप्या केलेल्या नियमावली, उडाण ५.५ अंतर्गत सीप्लेन संचालनासाठी मार्गदर्शक तत्वे अशा अनेक नव्या धोरणांची माहितीही देण्यात आली. ही परिषद भारताच्या हेलिकॉप्टर आणि लघुविमान क्षेत्राला दिशा देणारी, व्यावहारिक अडचणी सोडवणारी आणि स्थायिक व समावेशी वाढीसाठी मार्गदर्शक ठरणारी ठरली.