नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी भारताने सिंधू करार स्थगित केल्यानंतर आणि बगलिहार व सलाल धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर पाकिस्तानमध्ये चिनाब नदीच्या पाण्यात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी खरिप हंगामात पाकला मोठ्या प्रमाणाच अडचणींचा सामना करावा लागेल.
पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉन न्यूजनुसार, मराला हेडवर्क्सवर नोंदवलेला चिनाब नदीतील पाण्याचा प्रवाह रविवारी ३५,००० क्युसेकवरून सोमवारी सकाळी सुमारे ३,१०० क्युसेकपर्यंत कमी झाला. "रविवारी भारतीय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी चिनाब नदीचा प्रवाह जवळजवळ पाकिस्तानकडे रोखला आहे," असे पाकिस्तानच्या पंजाब सिंचन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी 'डॉन'ला सांगितले. याशिवाय, इस्लामाबादमध्ये मोंडी येथे झालेल्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाच्या सल्लागार समितीच्या बैठकीतही भारताच्या एकतर्फी निर्णयाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. यामुळे आधीच अंदाजे २१ टक्के टंचाईचा सामना करणाऱ्या खरीप पिकांना अतिरिक्त पाणीटंचाई निर्माण होईल.
उर्वरित सुरुवातीच्या खरीप हंगामासाठी पाकच्या पाणी नियामकाने एकूण २१ टक्के तुटवडा जाहीर केला आहे. तथापि, परिस्थितीचे दररोज निरीक्षण केले जाईल आणि जर टंचाई कायम राहिली तर टंचाईचा आढावा घेतला जाईल. पाकिस्तान आपल्या शेतीसाठी सिंचन पुरवण्यासाठी या नदी प्रणालींवर अवलंबून आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी भागातील ताज्या छायाचित्रांमध्ये चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद असल्याचे दिसून आले आहे. रामबनमधील दृश्यांमध्ये चिनाब नदीवरील बागलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद असल्याचे दिसून आले.