साहेब,सगळे गैरसमज तुमच्याबाबत का?

    01-May-2025
Total Views |

साहेब,सगळे गैरसमज तुमच्याबाबत का?



ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील हल्ला आहे,’ अशीही त्यांची सेक्युलरछाप मांडणी! विसंगत भूमिकांची बनवाबनवी करुनही माझ्याबद्दल माध्यमांमध्ये गैरसमज असल्याची पुष्टी ते जोडतात. पण, पवार साहेब, असे सगळे गैरसमज तुमच्याच बाबतीत का, याचाही एकदा विचार कराच!



माझ्याबाबतीत अर्धसत्य सांगितले जाते, पण मी लहानपणापासूनच पूजा करतो. मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा पांडुरंगाची पूजा केली आणि त्याचबरोबर तुळजापूरला जाऊनही पूजा करतो,” असे साडे तीन जिल्ह्यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना नुकताच सांगितले. विशेष म्हणजे, ठाण्यातील स्वतःला शरद पवार यांचा मानसपुत्र असा उल्लेख जो करतो, त्या जितेंद्र आव्हाड यांनी पाचपाखडी भागात जे तुळजाभवानीचे मंदिर उभारले आहे, त्या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पवारांच्या हस्ते झाली. पवार असे म्हणतात की, “मी अशा धार्मिक कार्यक्रमांना जात नाही, असे अर्धसत्य सांगितले जाते. प्रत्यक्षात, मी लहानपणापासून देवाची पूजा करतो, माध्यमे सांगतात ते अर्धसत्य,” असा त्यांचा आरोप. मात्र, याच माध्यमांसमोर पुण्याचे आराध्य श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दारात जाऊनही पवारांनी आत जाणे टाळले होते. का, तर म्हणे त्यांनी सामिष भोजन केले होते. म्हणजे सामिष भोजन केले हे त्यांना माहिती होते, तर ते श्रींच्या दारात तरी का केले होते? मंदिरात आत गेले नाहीत, पण श्रींचा प्रसाद त्यांनी दारात घेतला, तो कसा? याच पवारांची सुकन्या, संसदरत्न खासदार सुप्रियाताई या तर चतुर्थी दिवशी सामिष खाल्ल्याचे अगदी जाहीरपणे सांगतात. पवारांची कन्या ही त्यांचा आदर्श पुढे नेणारी, त्यांच्या संस्कारांचा, विचारांचा वारसा जोपासणारी, असे म्हटले जाते, पवारही तेच सांगत असतात. मग हाच तो वारसा म्हणावा का? इतके दिवस हेच आव्हाड हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवताना नेहमीच दिसून आले. मुंब्रा येथील धर्मांधांची त्यांनी नेहमीच बाजू घेतली. आज ते आव्हाड तुळजापूरच्या देवीचे मंदिर उभा करत, राज्यात ‘अंनिस’ची संस्था ज्यांनी स्थापन केली, ‘देवांना रिटायर करा’ ही शिकवण राज्यात दिली, छत्रपती शिवरायांचा नव्हे, तर शाहु-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र असल्याचे ज्यांनी आजवर सांगितले, त्यांच्याच हस्ते प्राणप्रतिष्ठा का केली, हे पवार आणि आव्हाडच जाणो!


इशरत जहाँ या आत्मघातकी दहशतवादीला,जेव्हा गुजरात पोलिसांनी चकमकीत टिपले, तेव्हा हेच पवार आणि आव्हाड ती कशी निर्दोष आणि निष्पाप आहेत, हे संपूर्ण देशाला सांगत सुटले होते. एकाचे म्हणणे होते की, ती निष्पाप महाविद्यालयीन तरुणी होती, तर दुसर्‍याचे म्हणणे होते की, ती कुटुंबाची एकुलती एक कर्ता आधार होती. म्हणूनच, ती गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना त्यांनी तातडीने दहा लाखांची मदत केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दुर्दैवी जिवांना त्यांनी काही मदत केल्याचे आजपर्यंत तरी ऐकिवात नाही. बाकी पवारांची तक्रार आहे ती अर्धसत्याबाबत. मात्र, पवार हे तर धादांत खोटे बोलण्यासाठी राज्यातच नव्हे, तर देशभरात (कु)प्रसिद्ध आहेत, हे कोणीही अमान्य करणार नाही. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कॅमेर्‍यासमोर 12 बॉम्बस्फोटांऐवजी न झालेला 13वा बॉम्बस्फोट मुस्लीमबहुल भागात झाल्याचे मुद्दाम सांगितले होते आणि आपण खोटे बोललो, हेदेखील त्यांनी नंतर मान्य केले होते. मुख्यमंत्रिपदावर असताना, त्यांनी अशा पद्धतीने वागणे कधीही अपेक्षित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रायरेश्वर येथे शपथ घेतली, हे इतिहास सांगतो. मात्र, पवारांच्या मते, शिवरायांनी अफझलखानाचा वध धार्मिक हेतूने केला नव्हता. 2017 साली पवारांनी हे विधान केले होते. इथेही ते धादांत खोटेच बोलले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कसे निधर्मी होते, हेच सांगण्याची धडपड त्यांनी स्थापना केलेली ब्रिगेडी पिलावळ पिवळ्या पुस्तकांच्या माध्यमातून अगदी आजही करीत असते.


नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांची पॅण्ट खाली खेचून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांसमोर त्यांना गोळ्या झाडून मारण्यात आले. त्यांचे आप्त, जिवलग हे सर्व जाहीरपणे सांगत असताना, पवारांचे म्हणणे वेगळेच ठरले. पहलगाम हल्ल्यात महिलांना हातही लावला नाही, तसेच यात हिंदूंना लक्ष्य केले गेले नाही, असेही अजब तर्कट त्यांनी मांडले. इशरत जहाँसारख्या दहशतवाद्याला दहा लाखांची मदत तत्परतेने त्यांनी दिली. मात्र, पहलगाम हल्ल्यातील मृत पावलेल्यांची दखल घेण्याइतके पवार मोठे ठरले नाहीत, ही शोकांतिकाच!


‘हिंदूराष्ट्र’ ही संकल्पनाच आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी यापूर्वीच म्हटले आहे. 2023 साली ‘हमास’ने इस्रायलवर आजवरचा जो सर्वांत रक्तरंजित हल्ला केला, त्यावेळीही याच पवारांनी हा दहशतवादी हल्ला करणार्‍या ‘हमास’चा यात काही दोष आहे, असे वाटत नाही, असे म्हटले होते. जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टी करणार्‍या पवारांना असे वाटणे हे अत्यंत स्वाभाविक. कुख्यात दाऊदच्या साथीदारांना जे पवार आपल्या पदाचा गैरवापर करत विमानातून सुरक्षितपणे इतरत्र घेऊन जातात, त्यांनी ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणे, हे त्यांच्या स्वभावाला, विचारसरणीला अनुसरूनच नाही का?



आता ठाण्यात त्यांना साक्षात्कार झाला आहे की, ते धार्मिक आहेत, लहानपणापासून पूजापाठ करतात. मात्र, याच पवारांनी काही वर्षांपूर्वी सार्वजनिकरित्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता आणि धर्म ही खासगी बाब आहे, असे सांगितले होते. मग आज अचानक त्यांनी जाहीररित्या माळा का हाती घेतल्या, हे न समजण्याइतपत जनता मूर्ख राहिलेली नाही. देशातील वातावरण पूर्णपणे बदललेले आहे. मुस्लिमांचा ‘व्होट जिहाद’ महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी हाणून पाडताना, महायुतीला विक्रमी, ऐतिहासिक जागांनी विजयी केले. तशातच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकविरोधात तीव्र जनभावना देशपातळीवर आहे. याचे शल्य पवारांच्या मनात आहे. म्हणूनच, येणार्‍या काळावर लक्ष ठेवत, आता त्यांनी दाढ्या कुरवळण्याऐवजी पुन्हा एकदा मंदिरांच्या पायर्‍या चढण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. हे फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘भावनिक राजकारण’ करण्याचा प्रयत्न नव्हे का, असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. पवार अनेकदा स्वतःचे जुने विधान नाकारतात. आधी बोलायचे, मग नाकारायचे, मग नवीनच भूमिका घ्यायची, या त्यांच्या जुन्याच खेळात जनतेचा विश्वासघात होतो. पवार हे अत्यंत विरोधाभासी व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या वक्तव्यांचा आढावा घेतला, तर अनेक वेळा राष्ट्रहितापेक्षा पक्षहित, सामाजिक समरसतेपेक्षा निवडणुकीतील गणित आणि सत्यापेक्षा जनतेची दिशाभूलच त्यांनी हेतूतः केलेली दिसते. म्हणूनच, त्यांच्या अचानक जागलेल्या श्रद्धा या प्रामाणिक नाहीत, हे शेंबडे पोरही सांगेल. तुम्ही जे पेराल, तेच उगवते, या उक्तीप्रमाणे तुमच्या आजवरच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला, तर तुमच्या परस्परविरोधी विधानांमुळेच, तुमच्याविषयीचे समज, गैरसमज नव्हे, हे अधिक पक्के झाले आहेत, हे साहेब तुमच्या कधी लक्षात येणार?