मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीतून परतली चिमुकल्याची श्रवणशक्ती

    16-Apr-2025
Total Views |

Chief Minister Relief Fund 
 
मुंबई: ( Chief Minister Relief Fund ) सात वर्षांपूर्वी ‘कॉक्लेअर इंप्लांट’ केलेल्या चिमुकल्याच्या मशिनचा प्रोसेसर बंद पडला. परिणामी मुलाला ऐकण्यासाठी अडथळा येवू लागला. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या खिशाला प्रोसेसर आणि शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. व्यतीत झालेल्या पालकांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष धावून आल्याने श्रवणशक्ती गेलेल्या १३ वर्षीय सिद्दीकची पुन्हा एकदा श्रवण शक्ती परत आल्याचे समाधान सिद्दीकच्या पालाकांनी व्यक्त केले.
 
सोलापुर जिल्ह्यातील, बार्शी येथे शकील शेख यांच्या मुलाला ऐकू येत नव्हते. चिंतेत असणाऱया आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीनंतर त्याला जन्मतः श्रवणशक्ती नाही, हे निदान झाले. त्यावर एकमेव उपाय म्हणजे ‘कॉक्लेअर इंप्लांट’. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला खर्च शेख कुटूंबियांना परवडणारा नव्हता. पुढे त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कडे धाव घेतली. त्यातून झालेल्या मदतीतून सिद्दीक याच्यावर कॉक्लेअर इंप्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
 
काही वर्षानंतर, कॉक्लेअर इंप्लांटचा प्रोसेसर बंद पडला, आणि पुन्हा सिद्दीकला श्रवणदोष सुरू झाला. सुरूवाती प्रमाणे परत शकील शेख यांच्यापुढे सिद्दीकच्या महागड्या उपचाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान स्थानिक आमदार दिलीप सोपल यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना विनंती केली. पुढे मा.मुख्यमंत्री यांची लेखी शिफारस आणि कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील केईएम रूग्णालयात सिद्दीकवर शस्त्रक्रिया करून कॉक्लेअर इंप्लांटचा प्रोसेसर बदलण्याकरिता पाऊले उचलली गेली.
 
आमच्यावर पुन्हा तीच परिस्थिती आली होती
 
माझ्या मुलाला जन्मतः ऐकू येत नव्हतं, हे आम्हाला उशीरा कळले. उपचार शक्य होते, पण खर्च अवाक्याबाहेर होता. कसेबसे उपचार केले. मात्र, काही दिवसांपुर्वी कॉक्लेअर इंप्लांटचा प्रोसेसर खराब झाला. सिद्दीकला पुन्हा ऐकू येणे बंद झाले, शिवाय त्याच्या उपचारासाठी आमच्यावर पुन्हा तिच परस्थिती आली. या कठीण काळात, आमच्या मदतीला धावून आलेले मुख्यमंत्री, कक्ष प्रमुख व डॉक्टर यांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन, अशी भावना वडील शकील शेख यांनी व्यक्त केली.