मुक्त विद्यापीठासाठी आरक्षित असलेल्या ठाणे महापालिकेच्या भूखंडाचा गैरवापर
मनसेची कारवाईची मागणी
05-Mar-2025
Total Views |
ठाणे: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) आरक्षित केलेला भूखंड शिक्षणाच्या उद्देशाने वापरण्याऐवजी अन्य व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या भूखंडावर व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने, हा भूखंडाच्या उद्देशाविरुद्ध गैरवापर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ठाणे शहरातील पोखरण क्रमांक २, हिरानंदानीजवळील निहारिका संकुलाजवळ असलेला भूखंड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला अल्पदरात भाडेतत्त्वावर दिला आहे. ठाणे शहरात विद्यापीठाचे केंद्र नसल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, हा मुख्य उद्देश होता. या भूखंडावर विद्यापीठाची स्थापना करून ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा हेतू होता. गेल्या दहा वर्षांपासून हा भूखंड रिकामा होता, मात्र आता विद्यापीठ स्थापनेसाठी देण्यात आलेल्या जागेचा वापर व्यवसायिक कारणांसाठी केला जात आहे. या भूखंडावर कपडे आणि घरगुती वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले असुन यासाठी मोठ्या प्रमाणावर तात्पुरते बांधकाम देखील करण्यात आले आहे. तरी हा भूखंड महापालिकेच्या वतीने विद्यापीठाच्या संस्थेकडून परत घेण्यात यावा तसेच बेकायदेशीरपणे प्रदर्शन भरवल्या बाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिंद्रकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.