नवी दिल्ली: ( Supreme Court ) एखाद्या व्यक्तीला ‘मियाँ-तिया’ आणि ‘पाकिस्तानी’ म्हणणे चुकीचे ठरेल, परंतु तो धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा ठरणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ४ मार्च रोजी दिला आहे.
न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर विचार सुरू होता, ज्याने अपीलकर्त्याला दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. “अपीलकर्त्यावर ‘मियाँ-तियां’ आणि ‘पाकिस्तानी’सारखे शब्द वापरून माहिती देणार्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे,” असे न्यायालयाने ‘भारतीय दंड संहिते’च्या ‘कलम २९८’ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे इत्यादी) अंतर्गत त्या व्यक्तीला दोषमुक्त करताना म्हटले. “निःसंशयपणे दिलेली विधाने अयोग्य आहेत.
तथापि, हे माहिती देणार्याच्या धार्मिक भावना दुखावण्यासारखे नाही,” असे न्यायालयाने नमूद केले.या प्रकरणातील ‘एफआयआर’ चास येथील उपविभागीय कार्यालयातील उर्दू भाषांतरकार आणि कार्यकारी लिपिक (माहितीचा अधिकार) यांनी दाखल केला होता. तक्रारदाराने आरोप केला आहे की, “जेव्हा तो माहिती अधिकार अर्जाबाबत माहिती देण्यासाठी अपीलकर्त्याला भेटायला गेला, तेव्हा आरोपीने त्याच्या धर्माचा उल्लेख करून त्याच्याशी गैरवर्तन केले आणि अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखण्यासाठी गुन्हेगारी बळाचा वापर केला.”