मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, त्याने हिंदू मंदिरं बांधली, तसेच संभाजी महाराज आणि औरंगजेब यांची लढाई धार्मिक नव्हती, असं म्हणत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर आता प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपहासात्मक शैलीत त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
अबू आझमीचं विधान नेमकं काय?
अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल बोलताना म्हटलं, “इतिहास चुकीचा दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बांधली होती. मी त्याला क्रूर प्रशासक मानत नाही. त्याच्या काळात भारताचा जीडीपी २४% होता, तसेच त्या काळी देशाची सीमा अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली होती. म्हणून मी या गोष्टींना चुकीचं म्हणू शकत नाही. संभाजी महाराज आणि औरंगजेब यांची लढाई राज्यकारभारासाठी होती, ती धर्माच्या आधारे नव्हती.”
शरद पोंक्षे यांची उपहासात्मक प्रतिक्रिया
या विधानानंतर शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेअर करत अबू आझमींवर जोरदार टीका केली. त्यांनी मिश्कील शैलीत म्हटलं, “इतिहास शिकवण्यासाठी आम्ही अबू आझमींचे आभार मानायला हवेत! त्यांनी सांगितलंच आहे की औरंगजेब किती चांगला माणूस होता. त्याने हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली, मूर्तींचा विध्वंस केला, हजारो स्त्रियांवर अत्याचार केले, आणि तरीही तो चांगला प्रशासक होता? एवढा चांगला माणूस होता, मग शिवाजी महाराजांनी उगीचच त्याच्याशी युद्ध का केलं? संभाजी महाराजांना हालहाल करून मारणं, हे तर आमच्या चुकीच्या इतिहासकारांनीच लिहिलं असावं, नाही का?”
'औरंगाबादमध्ये भव्य स्मारक उभारावं!’
शरद पोंक्षे यांनी पुढे उपहास करत म्हटलं, “संभाजीनगरचं नाव बदलून पुन्हा औरंगाबाद करावं आणि तिथे जगातलं सर्वात मोठं औरंगजेबाचं स्मारक उभारायला हवं. त्याचबरोबर अफजल खान, शाहिस्ते खान, आणि टिपू सुलतान यांनाही आपण दैवत मानायला हवं. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली हा वेडेपणा होता, कारण बाबरने राम मंदिर कधीच तोडलं नव्हतं! तसंच, काशी विश्वनाथ आणि मथुरेतील कृष्ण मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेबाची आठवण जपायला हवी!”
पोंक्षेंच्या या टीकेवर सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यांची भूमिका जोरदार समर्थन दिलं आहे.