आपण देवघरामध्ये अनेकदा देवपंचायत पूजन करावे, असे ऐकतो. काहीजण त्यानुसार आचरणदेखील करतात. मात्र, हे देवपंचायतन पूजन करण्याची पद्धत आचार्य आदि शंकराचार्य यांनी आणली. त्यामागे अनेक कारणे होती. या कारणांचा घेतलेला हा मागोवा...
देवपंचायतन पूजापद्धती आदि शंकराचार्यांनी का प्रचलित केली? त्याची कारणे विस्तृतपणे जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आपल्या धर्माची अशी मान्यता आहे की, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, त्या त्या वेळी ईश्वर अवतार धारण करतो आणि धर्माला आलेली ग्लानी दूर करतो. या संदर्भात श्री विष्णूंचे दशावतार सर्वांनाच माहीत आहेतच परंतु, आदि शंकराचार्य हा ज्ञानघन शिवाने घेतलेला अवतार आहे, असे मानले जाते.
आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये, नेहमीच पाच उपासना मार्ग सांगितले आहेत. पहिला निसर्ग उपासकांचा होता. वेद प्रकट होण्याची प्रक्रियाच, निसर्ग उपासनेमुळे झाली आहे. दुसरा उपासना मार्ग म्हणजे शुद्ध ज्ञानप्राप्ती, हा जीवनाचा हेतू बाळगणार्यांचा, त्यांच्यासाठी शिव किंवा रुद्र ही उपास्यदेवता होती. तिसरा होता शक्तीच्या उपासकांचा, जे शक्ती किंवा स्त्री तत्त्वाला प्रधान मानत असत. चौथा मार्ग होता, पालनकर्ता विष्णू, या स्वरूपामध्ये उपासना करणार्यांचा आणि पाचवा उपासनामार्ग होता, लौकिक जगातील ज्ञानाचे आपल्या जीवनामध्ये गणेश रुपात पालन करणार्यांचा.
या पाचही विचारसरणीचे लोकसुद्धा यज्ञच करत असत आणि यज्ञातूनच आपल्या उपास्य देवतेला, हवि प्रदान करत असत. परंतु, कालांतराने या पाचही उपासनापद्धतींचे पालन करणार्यांमध्येदेखील, आपसांत संघर्ष निर्माण झाला आणि प्रत्येकाला केवळ आपलीच उपासनापद्धती श्रेष्ठ वाटायला लागली. यातूनच या सर्वांमध्ये वाद, भांडणे, काही ठिकाणी युद्धदेखील झाल्याचे दाखले आहेत. या पाच संप्रदायांमधील परस्परवादंगांमुळेसुद्धा, सामान्य लोक धर्माप्रति अधिक उदासीन व्हायला लागले होते.
हिंदू धर्माच्या पाचही विचारसरणींमध्ये परस्पर संघर्ष जरी असला, तरीसुद्धा अंतिम सत्य हे एकच आहे. ईश्वराला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो आणि तुम्ही कोणत्याही मार्गाने जरी उपासना केली, तरी अंतिमतः तुम्ही त्या एकच सत्याच्या चरणी लीन होणार आहात, हा विचार सनातन भारतीय संस्कृतीचा गाभा होता. या मत-मतांतरांच्या किंवा वादांच्या पार्श्वभूमीवरसुद्धा, हा विचार लोप पावलेला नव्हता.
मात्र ,या सर्व अतिशय निराशाजनक कालखंडामध्ये, सामान्य लोकांपासून धर्माचे ज्ञान खूप दूर राहिले होते. धर्मातील सामान्य तत्त्वेसुद्धा लोकांना ज्ञात नव्हती. जसे संपूर्ण वैदिक विचारसरणीचा पाया चार आश्रम हा आहे. हे चार आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. या चारपैकी संन्यास आश्रमाचेच उदात्तीकरण झाल्याने, समाजात मोठ्या प्रमाणात निराशा पसरली होती. अशा ज्या निराशाजनक परिस्थितीत सकारात्मकतेचा लवलेशही उरला नव्हता, त्या कालखंडामध्ये आदि शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. अत्यंत मेधावी, विद्वान आणि प्रकांड पंडित असणार्या आचार्यांचे जीवन अत्यंत अद्भुत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांची मुंज झाली, आठव्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले, नवव्या वर्षी वेदशास्त्रसंपन्न होऊन त्यांनी, शिक्षण देण्यास प्रारंभ केला. नवव्याच वर्षी आचार्यांनी संन्यास धारण केला आणि गुरूंच्या शोधार्थ नर्मदातटाकी निघाले.
सनातन धर्माचेच पालन करणार्या पाचही मुख्य संप्रदायांमध्ये जो मत-मतांतराचा गलबला निर्माण झालेला होता, तो आधी शांत करणे, हे सगळ्यांत जास्त आवश्यक होते. आचार्यांनी या सगळ्या मंडळींशी, म्हणजे द्वैत प्रमाण मानणार्या मंडळींशी शास्त्रार्थ करून, त्यामध्ये त्यांना पराभूत केले आणि सनातन धर्माचा शुद्ध विचार अर्थात अद्वैत वेदांत स्वीकारायला लावला. संपूर्ण समाजाला एक करणे, चैतन्यपूर्ण करणे, मत-मतांतराचा गलबला कायमचा शांत करणे, हे आचार्यांच्या पुढे अवशिष्ट राहिलेले मुख्य कार्य होते. हे कार्य करण्यासाठी आचार्यांनी देवपंचायतन पूजापद्धतीचा पाया घातला.
तत्कालीन समाजाचे नैतिकतेच्या पातळीवर जे अधःपतन झाले होते, ज्या तर्हेची भौतिकता त्या समाजामध्ये बोकाळली होती त्याचे शमन करायचे असेल, तर त्यांना मूर्तिपूजा देणे क्रमप्राप्त होते. अशी एक सामायिक उपासना पद्धती देणे आवश्यक होते, ज्यामुळे हिंदू धर्माच्या पाचही विचारसरणींमध्ये परस्पर सामंजस्य, ऐक्य व स्नेहभाव वृद्धिंगत होईल आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्वांचा धर्म एकच आहे, ही भावना वाढीस लागेल. या पद्धतीचे एकत्रीकरण साधण्यासाठी, आचार्यांनी देवपंचायतन पूजापद्धतीचा वापर केला.
या देवपंचायतन पूजापद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की, पाचही संप्रदायांमध्ये मतैक्य निर्माण झाले. आपल्या पाचांचीही उपास्य देवता जरी भिन्न असली, तरी आपण सर्व या पाचही देवांची पूजा करत असल्याने,आपण सर्वजण एक आहोत, हा भाव समाजामध्ये रुजवण्यात आचार्य यशस्वी ठरले. देवपंचायतनमधल्या देवांशिवाय सहावी उपास्य शक्ती म्हणून आचार्यांनी, अन्नपूर्णेचीमूर्तीसुद्धा पंचायतनबरोबर ठेवायला सांगितली. अन्नपूर्णा ही कुटुंबातील कर्त्या स्त्रीचे रूप आहे. तीला आचार्यांनी ईश्वरी शक्तीचे स्थान दिले. संपूर्ण कुलामध्ये स्त्रीचे स्थान हे महत्त्वाचे असावे हे अधोरेखित करण्यासाठी, आचार्यांनी अन्नपूर्णेचीउपासना सांगितली. नंतरच्या कालखंडामध्ये दुर्दैवाने आपण त्याचे मर्मच समजून घेतले नाही.
अन्नपूर्णेची उपासना करताना आचार्यांनी सांगितलेला नियम खूप साधा, सोपा होता. कुटुंबामध्ये जी नवीन सून येईल, तिने आपल्या घरून अन्नपूर्णा आणायची, घरातील पूजेमध्ये असलेल्या आधीच्या अन्नपूर्णेचे विसर्जन करायचे आणि नव्या सुनेने आणलेल्या अन्नपूर्णेची स्थापना करायची, असा तो नियम होय. याचा अर्थ ज्या क्षणी कुटुंबामध्ये नवीन सून येईल, तिने तिच्या माहेरच्या कुटुंबातील खाद्यसंस्कार आपल्या घरामध्ये आणावे आणि तिचे खाद्यसंस्कार संपूर्ण घराने स्वीकारावे, हा व्यापक दृष्टिकोन त्या मागे होता.
थोडक्यात, सासवांनी निवृत्त व्हावे, हे त्यावेळी २ हजार, ४०० वर्षांपूर्वी सांगितले होते. मात्र, अजूनही आपण या गोष्टीचे पालन करू शकलो नाही. या नियमाचे पालन केले, तरी आपल्या ७० टक्के सामाजिक समस्यांचे निराकरण होऊ शकते किंवा आज जी विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे, तिला त्यागून पुनश्च एकत्र कुटुंब पद्धती निर्माण होऊ शकते. त्यामुळे, जितक्या डोळसपणे आपला समाज अन्नपूर्णेची उपासना करायला लागेल, तितके आपण विभक्त कुटुंबाकडून एकत्र कुटुंब पद्धतीकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल करू, असे माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे. आचार्यांनी सांगितलेली ही उपासनापद्धती आपल्या सर्वांच्या घरामध्ये, थोड्या कमी-अधिक प्रमाणात आहे. आजही आपण तिचे पालन करतो. मात्र, त्याचे खरे रहस्य आणि त्यामागील खरा भाव आपल्याला ज्ञात नाही. या लेखमालेनिमित्ताने, मी याचा कार्यकारणभाव समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
पंचतत्त्वांवर आधारित असलेली ही पंचायतन उपासनापद्धती सर्वांनीच स्वीकारावी आणि ज्या ईश्वरी शक्तीला तुम्ही उपास्य मानत असाल, तिला मुख्य ईश्वरी शक्तीचे स्थान देऊन देवपंचायतन सार्थ केलेत, तर एक प्रकारे ते ‘सांस्कृतिक हिंदुत्व’ या संकल्पनेला स्वीकारण्यासारखे होईल आणि वैश्विक पातळीवर मला कल्पना नाही. परंतु, भारताच्या पातळीवर तरी धार्मिक शांतता आणि धार्मिक सद्भाव आपण यातून निर्माण करू शकू.
९३७००४३९०१