तामिळ अभिनेता विजय थलपतीच्या इफ्तार कार्यक्रमावार वाद, मुस्लिम संघटनेची तीव्र प्रतिक्रिया!
12-Mar-2025
Total Views |
मुंबई : तामिळनाडू सुन्नत जमातने अभिनेता थलपती विजयच्या विरोधात चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. इफ्तार कार्यक्रमात ‘मुस्लिमांचा अपमान’ झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तक्रारीबाबत बोलताना तामिळनाडू सुन्नत जमातचे खजिनदार सय्यद कौस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, "विजय ने आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला. या कार्यक्रमात काही मद्यपी आणि गुंड सामील झाले होते, ज्यांचा उपवास किंवा इफ्तारशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम मुस्लिमांसाठी अपमानास्पद ठरला."
सय्यद कौस यांनी असा आरोप केला की हा कार्यक्रम अत्यंत ‘धक्कादायक पद्धतीने’ आयोजित केला गेला. विजय यांनी याबद्दल कोणतीही खेदाची भावना व्यक्त केली नाही. तसेच, त्यांनी दावा केला की विजय यांचे ‘विदेशी सुरक्षा रक्षक’ उपस्थितांसोबत अपमानास्पद वर्तन करत होते आणि लोकांशी जनावरांसारखा व्यवहार केला. त्यामुळे, यापुढे असे घडू नये यासाठी विजय यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. "आम्ही प्रसिद्धीसाठी तक्रार दाखल केलेली नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
विजयने हा इफ्तार कार्यक्रम शुक्रवारी रॉयपेट्टा वायएमसिए मैदानात आयोजित केला होता. त्यांनी मुस्लिम टोपी घालून नमाजमध्ये सहभाग घेतला आणि नंतर उपवास सोडला. त्यांनी उपस्थितांसोबत इफ्तार भोजनही केले. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.