लवकरच दीड कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार करू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
05-Feb-2025
Total Views |
मुंबई : प्रामाणिकपणे संघटन पर्व राबवणारा भाजप हा एकमेव पक्ष असून आपण लवकरच दीड कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित भाजपा संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशात भाजप हा एकमेव पक्ष आहे जो प्रामाणिकपणे आपले संघटन पर्व राबवतो. देशात प्रत्येक पक्षाला आपले संविधान तयार करावे लागते आणि त्या संविधानाच्या अनुरुप लोकशाही पद्धतीने पक्षाची रचना उभी करावी लागते. परंतू, हे कायद्याने खरे असले तरी अशा प्रकारे लोकतांत्रिक पद्धतीने व्यवस्था उभी करणारा एकमेव भाजप पक्ष आहे. या संघटन व्यवस्थेचा भाग म्हणून आपण प्राथमिक सदस्यांपासून सुरुवात करतो."
"चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. २०१४ साली अमित शाह अध्यक्ष झाल्यानंतर भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवण्याचा निर्णय घेऊन आपण संघटन पर्व सुरु केले. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकत आपण देशात ११ कोटी सदस्य करून जगातला सर्वात मोठा पक्ष बनलो. यावेळी भाजपने स्वत:चाच रेकॉर्ड मोडत १३ कोटींपेक्षा जास्त सदस्य केले आहेत. पुढच्या दोन ते तीन दिवसांत आपण १ कोटींचा आकडा पूर्ण करू. तसेच यात मागे राहिलेल्या काही जिल्हे आणि मतदारसंघांनी लक्ष घातले तर आपण दीड कोटींचा आकडा पार करून पावणे दोन कोटींपर्यंत जाऊ शकतो," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप हा शक्तीशाली पक्ष
ते पुढे म्हणाले की, "आपल्या पक्षाने सुरु केलेल्या पद्धतीमुळे आपल्याकडे खोट्या मेंबरशिपला वाव उरला नाही. अनेक लोकांनी प्रत्येकी १ हजारचा आकडा पूर्ण केला आहे. मात्र, काही मतदारसंघ अजूनही मागे आहेत. यात थोडे लक्ष घातले तर कुठलाच मतदारसंघ ५० हजारांच्या खाली राहू शकत नाही, अशी भाजपची यंत्रणा आहे. भाजप हा शक्तीशाली पक्ष असून आपली मोठी ताकद आहे. १० ते ११ दिवसांत रोज ५ लाख सदस्य करावे लागतील. असे केल्यास येत्या १५ तारखेपर्यंत दीड कोटींचा टप्पा निश्चित आपण पार पाडू."
पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री
"प्रत्येक व्यक्ती सक्रिय सदस्य असला पाहिजे. ज्या जिल्हात आपल्याला पालकमंत्री देता आले नाही तिथे आपण काही संपर्कमंत्री दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडणे किंवा जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम होईल. आपल्या शासनाने महाराष्ट्रात अतिशय गतीशिलतेने काम सुरु केले असून आपल्याला जनतेला परिणामकारक बदल दाखवायचा आहे. लोकांच्या जीवनात चांगले परिवर्तन करण्यासाठी संघटनेचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे," असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.