बेजबाबदारांची पोपटपंची

    04-Feb-2025
Total Views |
Rahul Gandhi and Sanjay Raut

राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे वर्णन कंटाळवाणे असे केले होते. पण, या अभिभाषणावरील गांधींचेच भाषण हे कंटाळवाणे आणि अगम्यही होते. उगाच मोठमोठे तांत्रिक शब्द वापरून, आपण काहीतरी महत्त्वपूर्ण बोलत असल्याचा आव त्यांनी आणला. दुसरीकडे उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी, अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान मोदी यांना काय समजले? म्हणून ते बाके वाजवत होते, असा प्रश्न केला. राऊत यांना अर्थसंकल्प म्हणजे काय? हे कळण्यास काही जन्म घ्यावे लागतील. तेव्हा त्यांनी मोदी यांच्या कृतीवर प्रतिक्रिया देण्याची उठाठेव करू नये.

लोकप्रतिनिधी झालोे की, आपल्याला जगातील सर्व विषयांचे सारे ज्ञान प्राप्त झाले, अशी खुळचट समजूत करून घेतलेले काही अर्धशिक्षित खासदार, सध्याच्या लोकसभा आणि राज्यसभेत आहेत. ज्या विषयात आपल्याला काही समजत नाही, त्यावरही वाटेल तशा प्रतिक्रिया व्यक्त करून हे लोकप्रतिनिधी स्वत:ची शोभा करून घेतात. पण, याची जाणीवही त्यांना नसते. उबाठा सेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे अशाच कुवतीपेक्षा अधिक अधिकार प्राप्त झालेल्या, सुदैवी खासदारांमध्ये मोडतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. त्यातील अनेक तरतुदी, सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात लाभदायक ठरणार्‍या आहेत. त्या सादर करताना, सत्ताधारी पक्षाचे खासदार स्वाभाविकपणेच बाके वाजवून त्यांचे स्वागत करीत होते. त्यात अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही होते. पण, अर्थसंकल्प समजण्यास ७२ तास लागतात, त्यामुळे मोदी यांना त्यातील काय समजले म्हणून ते बाके वाजवीत होते, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

राऊत यांना, अनेक साध्या साध्या गोष्टी समजण्यासही काही जन्म घ्यावे लागतील. त्यांना तर शरद पवार यांच्या निर्णयामागील खरा उद्देश कळण्यासही काही जन्म घ्यावे लागतात. हे त्यांनी स्वत:च कबूल केले होते. या स्थितीत त्यांनी जो आपला विषय नाही त्यावर बोलणे टाळले, तर ते निदान स्वत:च्याच तोंडून आपली बेअब्रू तरी करणार नाहीत. ‘स्वामी’ कादंबरीत माधवराव पेशवे हे त्यांच्या पगडीवरील शिरपेच कलला असल्याचे सांगणार्‍या एका पाणक्याला, आठ दिवस फटक्यांची शिक्षा देतात. कारण, पाणी भरण्याचे आपले काम सोडून त्याने, निष्कारण पेशव्यांच्या शिरपेचाची उठाठेव केली होती. आजच्या काळात अशी शिक्षा करता देता आली असती, तर करदात्यांच्या लाखो रुपयांची बचत झाली असती. कारण, लोकसभेत कारण नसताना, भलत्याच विषयावर बडबड करणार्‍या आणि सभागृहात गोंधळ घालणार्‍या अशा लोकप्रतिनिधींना त्यांची खरी जागा दाखवून देता आली असती. त्यामुळे आजच्या काळात जन्माला आल्याबद्दल राऊत यांनी स्वत:ला सुदैवी समजावे.

मोदी यांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करणार्‍या राऊत यांनी, लोकसभेवर निवडून येण्याइतकी तरी आपली पात्रता आहे का? ते आधी सिद्ध करावे. राऊत यांना मुंबई महापालिकेवरही निवडून येता येणे अशक्य आहे, इतकी त्यांची कुवत आहे. पक्षनेत्याच्या विश्वासामुळे त्यांना राज्यसभेचे सदस्य होता आले, हेच त्यांचे भाग्य आहे. त्यांचे नेते असलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकदा निर्मला सीतारामन यांना प्रांजळपणे सांगून टाकले होते की, आपल्याला अर्थसंकल्पातील तरतुदी समजत नाहीत. त्यांनी निदान या विषयावर आपला प्रांजळपणा तरी व्यक्त केला होता. पण, राऊत यांच्याकडे तितकाही पोच नाही. कारण, त्यांना एका उथळ आणि उन्मादी वृत्तपत्राचे संपादकपद देण्यात आले आहे. लिहिता-वाचता आले म्हणजे, फार तर व्यक्ती शिक्षित बनतो, सुसंस्कृत नव्हे. बुद्धिमान तर निश्चितच नव्हे. सुसंस्कृतपणा हा स्वभावात असावा लागतो. पण, राऊत यांच्यासारख्या अर्धशिक्षितांची स्वत:बद्दल भलतीच गैरसमजूत असते. पगारदार मध्यमवर्गीयांना वार्षिक १२ लाख रुपये उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागणार नाही, हा प्रस्ताव सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केला होता. यात न कळण्यासारखे काय आहे? राऊत यांना कदाचित अर्थसंकल्पातील तरतुदी समजण्यास ७२ तास लागत असतील. पण, त्यांनी स्वत:वरून इतरांच्या बौद्धिक कुवतीची कल्पना न केलेली बरी. इतकी साधी तरतूद आणि तिचे महत्त्वही राऊत यांना समजत नसेल, तर त्यांना मुळात राजकारणातच राहण्याचा काही अधिकार नाही.

दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात भाषण करताना, अगम्य भाषेचा वापर केला. राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाचे वर्णन कंटाळवाणे असे केले होते. कारण, मोदी सरकारने केवळ दहा वर्षांत केलेल्या प्रचंड कामाची आणि देशाला जगात मानाचे स्थान देण्यासाठी त्यांनी केलेल्या भगिरथ प्रयत्नांची यादी ऐकून, त्यांना मनोमन लाज वाटली असावी. पण, त्यावर भाष्य करताना त्यांनी जे भाषण केले, त्यात अगम्यता भरलेली होती. मोदी यांनी भारताला जगाचे उत्पादन केंद्र करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ हे मिशन राबविले असून, त्याला भरपूर प्रमाणात यश येत आहे. भारतातून आता अन्नधान्यच नव्हे, तर शस्त्रास्त्रेही निर्यात होऊ लागली आहेत, ही मोदी यांची अपूर्व कामगिरी म्हणावी लागेल. तसेच, कोविडनंतर अनेक राष्ट्रांनी चीनमधील आपले कारखाने अन्यत्र हलविण्यास सुरुवात केली असून, त्यापैकी अनेक कारखाने भारतात उभे राहात आहेत. त्यात ‘अ‍ॅपल’सारख्या अत्याधुनिक मोबाईल फोन उत्पादक कंपनीचाही समावेश आहे. पण, राहुल गांधी यांना या क्षेत्रात भारत अयशस्वी झाल्याचे वाटत आहे. तसे त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविले. परंतु, त्यासाठी त्यांनी जी काही अगम्य भाषा वापरली, ती येथे नमूद करणे आम्हांला शक्य नाही.

राऊत काय किंवा राहुल गांधी काय, या विरोधी नेत्यांवर सध्या कसलीच जबाबदारी नाही. येती पाच वर्षे त्यांना केवळ मोदी सरकारवर टीका करीत राहावे लागणार आहे. त्यासाठी ठोस आणि खर्‍या मुद्द्यांची गरज त्यांना भासत नाही. मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर केवळ नकारात्मक दृष्टिकोन ठेवून टीका करणे, इतकाच त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या सुदैवाने जनतेने त्यांना निवडून दिले आहे. संसद सदस्य असल्याचा गैरफायदा घेत हे नेते सभागृहाबाहेर जे बोलता येणार नाही, ते सभागृहात बोलून आपली मळमळ व्यक्त करीत असतात. तसे करताना ते आपली खरी लायकी आणि आपली बौद्धिक कुवत किती कमी आहे, तेच दाखवून देत असतात. बेजबाबदारांच्या या पोपटपंचीला कोणीच गांभीर्याने घेत नाही.