मालमत्ता करात वाढ नाही! आरोग्य क्षेत्रासाठी १० टक्के खर्च; महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
04-Feb-2025
Total Views |
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला असून आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषद घेत या अर्थसंकल्पाबाबत विस्तृत माहिती दिली.
भूषण गगराणी म्हणाले की, "मुंबई महापालिकेकडून असलेल्या मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पात अधोरेखित झाल्या आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ७४ हजार ४०० कोटींचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. गेल्यावर्षी हा अर्थसंकल्प ६५ हजार १८० कोटींचा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी १४.१९ टक्के वाढ झाली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ हजार ४१० कोटींची महसुली वाढ झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने विकास नियोजन आणि शुल्क, अग्निशमन दल आणि जकाती पोटी येणारी भरपाई या तीन गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भांडवली विभागासाठी ४३ हजार १६२ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागासाठी ३१ हजार २०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर आकारमानाच्या ५८ टक्के भांडवली तर ४२ टक्के महसुली अशी या अर्थसंकल्पाची रचना आहे."
व्याज परताव्यात वाढ
"यावर्षी गुंतवणुकीवरील व्याज परताव्यात अर्धा टक्का वाढ झाली आहे. महसुली उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतांपैकी मालमत्ता करात आणि जल आणि मलनिस्सारण करात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. २०१७-१८ पासून ७५ टक्क्यांवर असलेला महसूल खर्च आता ४२ टक्क्यांवर आला आहे. तर भांडवली खर्चात २५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे."
महसूल वाढीसाठी उपाययोजना
"झोपडपट्ट्यांतील व्यावसायिक अस्थापनानांचा सर्व्हे सुरू केला असून त्यातून चालू वर्षात ३५० कोटींचा अतिरिक्त मालमत्ता कर मिळण्याची अपेक्षा आहे. घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क टप्प्याटप्प्याने लावण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच काही मालमत्ता आणि भूखंड दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देऊन त्यातून उत्पन्न मिळवणार आहे. वरळी आणि क्रॉफर्ड मार्केटमधील दोन भूखंड भाडेतत्त्वावर दिले आहेत. राज्य शासनाकडून येणाऱ्या ९ हजार ७०० कोटी रुपये थकबाकीचा पालिकेला लवकरात लवकर परतावा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महसूली खर्च हा उपलब्ध तरतूदीपेक्षा जास्त होता कामा नये, असा निर्बंध सर्व विभागांना घालून देण्यात आलेला आहे," असे भूषण गगराणी यांनी सांगितले.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी विशेष उपाययोजना
"पायाभूत सुविधांवर मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणात भर देत आहे. मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येवर उपाय म्हणून काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून आतापर्यंत १,३३३ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. यानंतरच्या टप्पा १ मध्ये ६९८ किमी रस्ते तर टप्पा २ मध्ये १४२० किमी रस्त्यांचे काम प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यातील ७५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्के काम जून महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. ३१ मे २०२५ पर्यंत जे रस्ते १०० टक्के पूर्ण होऊ शकतील तेवढेच खोदकाम करणार असून अन्य खोदकाम न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहनतळावरील पार्किंगसाठी एक अॅप तयार करण्याचे काम सुरु असून पुढच्या तीन महिन्यात ते कार्यान्वित करणार आहे. तसेच रोबोटिक्स कार पार्किंग तयार करण्यात येणार आहे."
एकूण बजेटमधील १० टक्के खर्च आरोग्य क्षेत्रासाठी
"एकूण अर्थसंकल्पापैकी १० टक्के आरोग्य सुविधांसाठी खर्च करणार आहे. यावर्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ३ फिजिओथेरपी सेंटर नव्याने सुरु करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रात खासगी सहभाचे महापालिकेचे धोरण प्रभावीपणे राबवणार असून ज्यामुळे पायाभूत सुविधा आणि प्राथमिक आरोग्य सेवांवर जास्त भर देता येईल. केईएम रुग्णालयात आयुष्यमान शताब्दी टॉवर या नवीन इमारतीचे काम हाती घेणार आहे," असेही आयुक्तांनी सांगितले.